
नवी दिल्ली : जवळपास दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला होता. भारतालाही याचा मोठा फटका बसला होता. कोरनाच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वे गाड्यांवर बंदी घालण्यात आली होती. याऐवजी सरकारद्वारे विशेष रेल्वे चालवली जात होती. परंतु आता कोरोनाची महासाथ नियंत्रणात आली असून रेल्वे मंत्रालयानंदेखील मोठा निर्मया गेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं आता या गाड्या पुन्हा नियमित गाड्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार १७०० पेक्षा अधिक ट्रेन या नियमित ट्रेन म्हणून पुन्हा तात्काळ सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरनुसार आता प्री कोविड असलेले तिकिटदर लागू करण्यात येणार आहे. याचाच अर्थ ज्या विशेष तिकिट दरानुसार रेल्वे सुरू होत्या त्याचे दर आता सामान्य होणार आहेत. याचाच अर्थ आता जनरल तिकिट असलेली सिस्टम संपणार आहे. आता केवळ रिझर्व्ह आणि वेटिंग तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार. जनरल क्लासचं कोणतंही तिकिट आता मिळणार नाही. तसंच यापूर्वी बुक करण्यात आलेल्या तिकिटांवर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसचं कोणतेही पैसे परतही करण्यात येणार नाही.
कोरोना काळात करण्यात आलेले बदल आता हळूहळू कमी करण्यात येत आहे. परंतु कोरोनाचे प्रोटोकॉल मात्र पाळावे लागणार आहे. नियम तोडल्यास संबंधितांवर कारवाईदेखील केली जाणार आहे. २५ मार्च २०२० रोजी ट्रेन सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. १६६ वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदा करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र मालगाड्या आणि श्रमिक ट्रेन्स सुरू करण्याला परवानगी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर विशेष रेल्वे सेवा सलुरू करण्यात आली होती. तसंच नियमित ट्रेनचे क्रमांकही बदलण्यात आले होते. परंतु आता पुन्हा एकदा कोविडपूर्व स्थिती येणार आहे. विशेष ट्रेनची सेवा आता बंद केली जाणार असून तिकिट दरही पूर्वीप्रमाणेच असतील.