स्वच्छ भारत योजनेत ६५ लाखांचा घोटाळा; भाजप आमदारासह ११ जणांविरोधात गुन्हा

यवतमाळ : मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन योजनेत भाजपच्या आमदाराने ६५ लाखांचा घोटाळा केल्याप्रकरणी भाजप आमदार तथा नगराध्यक्ष नामदेव ससाणे यांच्यासह ११ जणांविरुद्ध उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी थेट नगर विकास मंत्रालयाने आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.
स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा संकलन व विल्हेवाट कामात ६५ लाखाचा घोटाळा झाल्याचे उजेडात आले आहे.
या प्रकरणी मुख्याधिकारी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे भाजप आमदार तथा नगराध्यक्ष नामदेव ससाणे, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, राष्ट्रवादी नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन सभापती पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बाल कल्याण सभापती सविता पाचकोरे, लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव अशा ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




