Top Newsस्पोर्ट्स

बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव २१० धावांवर गडगडला

भारत दुसऱ्या डावात २ बाद ५७ धावा; ७० धावांची आघाडी

केप टाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताला दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी होती. पण, लोकेश राहुल ( १०) व मयांक अग्रवाल ( ७) हे सलामीवीर याही डावात अपयशी ठरले. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५७ धावा करताना ७० धावांची आघाडी घेतली आहे. विराट कोहली ३९ चेंडूंत १४ व चेतेश्वर पुजारा ३१ चेंडूंत ९ धावांवर नाबाद आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये ५०ची सरासरी राखणारा विराट हा एकमेव आशियाई फलंदाज ठऱला आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २०९ धावांवर आटोपला. कीगन पीरसनने झुंजार फलंदाजी करत ७२ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करत ५ बळी टिपले. मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी त्याला चांगली साथ दिली.

विराट कोहलीच्या ७९ आणि चेतेश्वर पुजाराच्या ४३ धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २२३ धावा केल्या. कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना १७ धावांवर माघारी पाठवले. उमेश यादवनं तिसरा धक्का देताना केशव महाराजला (२५) त्रिफळाचीत केले. पण, किगन पीटरसन खेळपट्टीवर शड्डू ठोकून बसला. सुरुवातीला त्यानं रॅसी व्हॅन डेर ड्युसेनसह ११४ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर टेम्बा ववुमासह ९७ चेंडूंत ४२ धावा केल्या. या दरम्यान पीटरसननं या मालिकेतील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. उमेश यादवनं ड्युसेनला (२१) बाद केले.

पीटरसन व ववुमा ही जोडी भारताला डोईजड झाली होती आणि तेव्हा विराटनं मोहम्मद शमीला पाचारण केले. ५६ षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीनं बवुमाला (२८) झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कायले वेरेयने ( ०) रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर बुमराहनं धक्के देण्यास सुरुवात केली. त्यानं सर्वात मोठी विजय मिळवून देताना १६६ चेंडूंत ९ चौकारांसह ७२ धावा करणाऱ्या पीटरसनला बाद केलं. कागिसो रबाडा आणि ड्युआने ऑलिव्हर यांनी ९व्या विकेटसाठी महत्त्वाच्या २१ धावा जोडून आफ्रिकेला दोनशेपार नेले. बुमराहनं आफ्रिकेला अखेरचा धक्का देताना त्यांचा पहिला डाव २१० धावांवर गुंडाळला. बुमराहनं या सामन्यात ४२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. यादव व शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

ज्या मैदानावर पदार्पण तिथेच साधला परफेक्ट पंच

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ५ जानेवारी २०१८ रोजी केप टाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर पदार्पण केलं होतं. आता चार वर्षांनंतर त्याच मैदानावर बुमराहने केप टाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाच विकेट्स टिपण्याचा पराक्रम केला आहे. त्याने ४२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्या कामगिरीच्या जोरावर बुमराहने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. हा बुमराहचा परदेशातील २५ वा कसोटी सामना आहे. तसेच तो २५ सामन्यात सर्वाधिक बळी टिपणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी पहिल्या २५ कसोटींमध्ये परदेशात भागवत चंद्रशेखर यांनी १०० विकेट्स टिपल्या होत्या. मात्र बुमराहने एवढ्याच सामन्यात १०८ बळी टिपले आहेत. जसप्रीत बुमराहने कसोटीत पदार्पण केल्यापासून तो कसोटीत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहने ७ वेळा डावात पाच बळी टिपले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये जेसन होल्डर आणि टीम साऊदी हे बुमराहच्या बरोबरीत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर जसप्रीत बुमराहने दुसऱ्यांदा डावात पाच बळी टिपण्याचा विक्रम केला आहे. त्याने मोहम्मद शमी, व्यंकटेश प्रसाद आणि एस. श्रीशांतची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक तीन वेळा पाच बळी टिपण्याची कामगिरी भारताकडून जवागल श्रीनाथने केली होती. जसप्रीत बुमराहने कसोटीत सात वेळा पाच बळी टिपले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने सातही वेळा परदेशात ही कामगिरी केली आहे. भारताकडून याबाबचा विक्रम कपिल देव यांच्या नावे आहे. त्यांनी परदेशात १२ वेळा डावात पाच बळी टिपले होत. तर इशांत शर्माने ९ वेळा, झहीर खानने ८ वेळा ही कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा, वेस्ट इंडिजमध्ये दोन वेळा, इंग्लंडमध्ये दोन वेळा तर ऑस्ट्रेलियात एकदा डावात ५ बळी टिपले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button