नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारविरोधात पुढील राजकीय रणनिती आखण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ४ वाजता ही ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीतून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्यासाठी नवा अॅक्शन प्लॅन तयार केला जाण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधींनी बोलावलेल्या या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षांचे मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय देशातील विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे अनेक नेते सहभागी होणार आहेत. या बैठकीदरम्यान मोदी सरकारकडून सुरु असलेली विरोधकांची मुस्काटदाबी, २०२४ लोकसभा निवडणुका, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि शिवसेना युतीची चिन्ह दिसणार नाहीत अशा चर्चा राजकीय गोटात रंगू लागल्या आहेत. तर शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.