पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंग सिद्धू
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची नियुक्ती केली आहे. सोनिया गांधींनी याबाबतचं अधिकृत पत्रक काढूनच सिद्धूंच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील राजकीय तणाव अखेर निवळला आहे.
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर अमरिंदर सिंग यांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेला निर्णय सर्वांनाच मान्य राहील, असं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अमरिंदर यांची नाराजी दूर झाल्याचं स्पष्ट झालं.
पंजाब काँग्रेसमध्ये यामुळे दुफळी निर्माण झाली आहे. हा वाद सोनिया गांधींपर्यंत पोहोचला होता. बऱ्याच बैठका आणि चर्चेनंतर सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यास अमरिंदर सिंग यांनी विरोध केला होता. या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो. पक्षातील हिंदू नेते नाराज होतील, असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता.
पंजाबच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळून सिद्धू यांना मोठी जबाबदारी दिली आहे. या निर्णयानंतर सिद्धू यांनी मंत्री तसेच आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवातही केली आहे.