राजकारण

बिहार विधानसभेत तुफान हाणामारी; आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारले!

पाटणा : बिहारमधील वाढती गुन्हेगारी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आरजेडी कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्जही केला. यावेळी आरजेडी कार्यकर्त्यांकडून जोरदार दगडफेकही करण्यात आली. यात अनेक पोलीस कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधीही जखमी झाले आहेत. वातावरण अधिक गंभीर बनल्यानंतर पोलिसांनी तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांना ताब्यात घेतलं आहे.

बिहारच्या विधानसभेत मंगळवारी जोरदार राडा आणि धिंगाणा पाहायला मिळाला. बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन तुफान गोंधळ झाला. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला. इतकच नाही तर जोरदार राडाही घातला. एक महिला आमदार विरोध करत असताना थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचली. शेवटी महिला पोलिसांना पाचारण करत त्या आमदाराला सदनाबाहेर काढण्यात आलं. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना साध्या ड्रेसमध्ये सदनात तैनात करण्यात आलं होतं.

दुपारी 4.30 वाजता सदनाची कामकाज सुरु होणार होतं. पण त्यापूर्वीच आरजेडीसह अन्य विरोधी पक्षाचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या गेटजवळ पोहोचले. त्यांनी अध्यक्षांना कोंडून घेतलं. त्यांना हटवण्यासाठी राज्य राखील पोलीस दलाच्या जवानांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी एक एक करुन सर्व आमदारांना सदनाच्या बाहेर काढलं आणि अध्यक्षांची सुटका केली.

या राड्यात आमदार सत्येंद्र कुमार यांनी आरोप केला आहे की, एसपींच्या सांगण्यावरुन त्यांच्या छातीत लाथ मारण्यात आली. छाती मार लागल्याची तक्रार सत्येंद्र कुमार यांनी केली आहे. हा फक्त अन्याय नाही तर लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमदारांनी सांगितलं की, महिला आमदारांनाही मारहाण करण्यात आली आहे. हे सरकार महिला सशक्तीकरणाचं ढोंग करतेय, अशी टीकाही त्यांनी केलीय. पोलिसांनी अनेक आमदारांना मारहाण केलीय. पायाला धरुन ओढून नेत सदनाबाहेर काढण्यात आलं. या सर्व राड्यानंतर जखमी आमदारांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं.

बिहारमधील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभेला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी तेजस्वी यादव आणि आरजेडी कार्यकर्ते पाटण्याताली जेपी. गोलंबर इथे जमले. त्यांनी विधानसभेवर कूच करण्याची तयारी केली. पण जिल्हा प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यानंतर आरजेडी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेरिस पोलिसांनीही बळाचा वापर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button