राजकारण

एखाद्याला मुन्ना वगैरे हाक मारतात तसं मला ‘दाऊद’ म्हणत असतील; वानखेडेंच्या वडिलांचा अजब दावा

मुंबई : समीर वानखेडे यांनी आपली धार्मिक ओळख लपवल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला बुधवारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याची कागदपत्रे जाहीर केली होती. मात्र, एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना अशी हाक मारली जाते. तसंच माझ्या पत्नीचे नातेवाईक किंवा अन्य कोणीतरी मला प्रेमाने दाऊद हाक मारत असावेत. मी ही शक्यता नाकारत नाही, असा अजब दावा वानखेडे यांच्या वडिलांनी केला आहे.

कोणीही मला काहीही हाक मारत असो, पण मी मागासवर्गीय आहे. मग माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होऊ शकतो? फेसबुकवर दाऊद वानखेडे या नावाने प्रोफाईल असल्याचे मला माहिती नाही. पण एखादवेळी माझ्या पत्नीकडील नातेवाईक मला दाऊद म्हणाले असतील, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले. तसेच आपण लवकरच समीर वानखेडे यांच्या खरा जन्मदाखला सादर करु, असा दावाही ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.

नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button