परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. कारण राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या बैठकीत पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर केलेले आरोपांवर चर्चा झाली.
पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप केला होता. या बाबत वर्षावर झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला असून यामध्ये गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे समजते. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दोन दिवसांपूर्वी परमबीर सिंग यांची चौकशी केली. गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी केली. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचार आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.