काही ओबीसी नेते भाजप नेत्यांच्या रडारवर : एकनाथ खडसेंचा आरोप
जळगाव : मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपा ने नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र गेल्या चारपाच वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करीत असल्याचं पाहायला मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
खडसे यांनी म्हटलं आहे की गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले, बदनाम करण्याचे काम केले, चंद्रकांत बावनकुळे यांना तिकीट नाकारण्यात आले असेल, धनगर समाजाचे अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर असतील अशी कितीतरी नाव आहेत. यांचा काहींना काही कारणाने छळ करण्यात आला मात्र पार्टी म्हणून तो सहन करण्यात आला होता.
खडसे म्हणाले की, अलीकडे चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना धमकी दिली की तुम्ही जामिनावर आहात, म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या विरोधात असो की छगन भुजबळ यांच्या बाबत असो ईडी लावण्याचा प्रकार म्हणजे सर्व षडयंत्र यांचेच आहे हे आता उघड व्हायला लागले आहे. म्हणजे यांच्या विरोधात बोललं, यांच्यासोबत गेले नाही, आमची साथ देणार नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात ईडी किंवा सीबीआय लावू असा त्याचा अर्थ आहे. मात्र छगन भुजबळ अशा गोष्टींना घाबरतील असे नाही अस खडसे यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, सरकार आले, सरकार गेले मात्र विरोधकांना कारण नसताना ईडी लावावी आणि त्याचा छळ करवा अस कधी घडत नव्हतं. मात्र अलीकडच्या काळात मात्र माझा कोणताही संबंध नसताना केवळ मी पक्ष बदलला म्हणून त्रास देण्यासाठी चौकशा लावण्याचा प्रयत्न केला जात आहेत. पूर्वी ईडी किंवा अन्य गोष्टी जनतेला माहीत नव्हत्या. त्या आता माहीत होऊ लागल्या आहेत. मात्र विरोधकांना दाबून ठेवण्यासाठी जर अशा यंत्रणांचा वापर केला जात असेल तर ते योग्य नसल्याचं ही खडसे यांनी म्हटलं.
खडसे म्हणाले की, सध्याची परिस्थिती हालाखीची आहे या परिस्थितीमध्ये कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली आहे आणि अशाच प्रकारची भूमिका आपण मागच्या महिन्यात मांडली होती. त्यामुळे विरोधक असो वा सत्ताधारी यांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कोरोनाची लढाई लढली पाहिजे. केवळ टीकाटिपण्णी करून यंत्रणा ही नाउमेद होत असते. त्यामुळे असं होता कामा नये, असं गडकरी यांनी म्हटलं आहे आणि आपण त्यांच्या मताशी सहमत असल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.