संभाजीराजेंचे आंदोलन कोणाच्या विरोधात?; अरविंद सावंतांचा सवाल

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चाची हाक दिली आहे. कोल्हापूरमधून १६ जूनला पहिला मोर्चा निघणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. परंतु शिवेसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजेंना सवाल केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांचे आंदोलन कोणाविरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का? केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? की राज्य सरकारच्या विरोधात आहे? हे त्यांनी स्पष्ट करावे असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. दुसरीकडे संभाजीराजेंच्या घोषणेचे भाजपकडून स्वागत करण्यात आले असून आंदोलनाला पाठिंबाही दिला आहे.
शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मराठा आरक्षण न्यायिक लढाई आहे हे विसरता कामा नये, कोणासाठी लढतोय? कशासाठी लढतोय? आणि कोणाच्या विरोधात लढतोय? एवढे लक्षात घेतलं पाहिजे. जिथे राज्य सरकार तुमच्यासोबत आहे त्यांच्याविरोधात मोर्चा काढून काय होणार आहे. जर आता आंदोलन किंवा मोर्चा असेल त्याचा अर्थ असा आहे की ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आहेत. परंतु राज्य सरकार हा लढा उत्तम लढत असून राज्य सरकारने तशी पावले उचलली आहेत असे सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुढे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, संभाजीराजेंबद्दल मनात आदर आहे आणि तो सर्वांच्याच मनात आहे. ते उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करत नाहीत. फक्त हे आंदोलन कोणाच्या विरोधात आहे. हे त्यांनी सांगितले पाहिजे. संभाजीराजे छत्रपती यांचे आंदोलन कोणाविरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का? केंद्र सरकारच्या विरोधात आहे का? की राज्य सरकारच्या विरोधात आहे? असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.




