नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपच्या इतर नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर पलटवार केला आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं, ‘संजय राऊत म्हणतात की मी अलिबागमधील त्या जागेवर घेऊन जातो तिथे बंगले दिसले तर आम्ही माफी मागू आणि नाही दिसले तर किरीट सोमय्यांना जोड्याने मारु. हे किरीट सोमय्यांना जोड्याने मारण्याची गोष्ट आहे की रश्मी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलत आहेत संजय राऊत?. १९ बंगले हे कुणाच्या नावावर आहेत? संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्या नावावर आहेत का? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० या १९ बंगल्यांचा प्रॉपर्टी टॅक्स ग्रामपंचायतीत भरला. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर.’
दरम्यान, राऊत यांनी काल आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांना आज पत्रकारांनी सोमय्या यांना विचारले की, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या या प्रश्नावर सोमय्यांची आज भंबेरी उडाली. त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला. यावेळी सोमय्या यांनी ही गोष्ट सावरुन नेत पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी आमचा दमडीचा संबंध नाही असं सांगितलं. सोमय्या म्हणाले की, आम्ही त्या बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. डीएचएफल घोटाळा पण आम्हीच बाहेर काढला. तरीही तर संजय राऊत यांच्याकडे याच्याशी सबंधित डॉक्यूमेंट होते किंवा आहेत तर त्यांना ईडीने इतक्या वेळा बोलवलंय तेव्हा द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात.
सोमय्या मुलाच्या कनेक्शनवर बॅकफूटवर?
सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप राऊतांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमय्यांनी थेट राजधानी दिल्ली गाठून प्रेस कॉन्फरन्स घेतली. मात्र मुलाविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या बॅक फूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. ४०० कोटीला मारा गोळी, तो छोटा प्रोजेक्ट आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. नील ज्या कंपनीत आहे, तो एक दोन वर्षांपूर्वी त्या कंपनीशी जोडला गेला. तो तर अगदी छोटा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचंय. चला मी येतो.. खोल्या सॅनिटाईज नसतील तरी चालतील.. पोलिसात तक्रार करायला गेलो, तर तुमचे गुंड आले.. मी कागद देतोय ना, असंही किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
जोड्याने कोणाला मारणार?
इतकेच नाही तर रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वी १० वर्षांचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईक यांच्या नावाने १२ नोव्हेंबर २०२० ला रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे, किरीट सोमय्यांनी भरला नाही. संजय राऊत साहेब जोड्याने तुम्ही कोणाला मारणार आहात? असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.
रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी टॅक्स भरला आहे आणि केव्हापासूनचा तर १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्यांचा टॅक्स, आरोग्य कर, दिवाबत्ती कर हे भरण्यात आलं आहे. १२ नोव्हेंबर २०२० का? कारण, ११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या जमिनीच्या संबंधित, व्यावसायिक संबंध हे किरीट सोमय्यांनी उघडकीस आणले होते. हे बंगले अन्वय नाईक यांनी २००८ ला बांधले. २००९ पासून दरवर्षी या बंगल्यांचा कर आधी अन्वय नाईक आणि त्यानंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर भरत आहेत असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं. अलिबागमधील १९ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी भरला आहे. रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी कर भरला. जर बंगलेच नाहीत तर मग कर का भरला? असा सवालही यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीने दिलेले कागदपत्र किरीट सोमय्यांकडून सादर करण्यात आले. वनखात्याच्या जमिनीवर घरं बाधल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केली. संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना किरीट सोमय्यांनी म्हटलं, १९ घरे आहेत की नाही हे पाहण्यासाठी रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांना घेऊन जा.
सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, भर पत्रकार परिषदेत हंगामा
आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्यानं मारू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. या आरोपांना उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मोठा हंगामा केला. मला जोड्याने मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे पुरावे पहावे, तपासाने आणि मग हवं असेल तर मला जोड्यानं मारावं, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतच पायातले जोडे काढले
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी मोठा हंगामा केला. ते म्हणाले, त्यांनी हा बंगल्यांचा विषय काल का काढला. संजय राऊत जोड्यांनी मारा म्हणताय किरिट सोमय्याला? अरे जोड्याने मला मारणार तू… असे म्हणत किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत पायातला जोडा काढला. मला मारायचं असेल तर मला मारा की जोड्यानं.. मी माझाच जोडा देतो संजय राऊतांना.. मी उभा आहे तुमच्यासमोर. १९ बंगल्याच्या वादाप्रकरणी संजय राऊत किरीट सोमय्याला जोडे मारणार असेल तर मी माझा जोडा संजय राऊतच्या हातात द्यायला तयार आहे. त्यानी केलेल्या बंगल्यासंबंधी मी पुरावे दिले आहेत. त्यांनी याबाबत रश्मी ठाकरेंना याबाबत विचारावं.. असा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला.
खुन्नस काढण्यासाठी सोमय्यांचा उपयोग का?
किरीट सोमय्यांनी पुढे म्हटलं, घर नसताना प्रॉपर्टी टॅक्स भरतात. मला तर हेच म्हणावं लागेल की घरे चोरीला गेली का असं म्हणायचं अन्वय नाईक यांनी तुमची फसवणूक केली? संजय राऊत तुम्हाला उद्धव ठाकरेंवर खुन्नस काढायची असेल तर मग निल सोमय्याचा उपयोग का करताय? थेट जाऊन सांगायचं होतं मुख्यमंत्री साहेब तुम्ही मला मदत करत नाहीयेत.
रश्मी ठाकरेंवरही आरोप
संजय राऊत यांनी कर्जतच्या जमिनीच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.यासंदर्बात किरीट सोमय्या यांनी भाष्य केलं आहे. मी कर्जतला गेलो. तिथे चौकशी केली. श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असून रश्मी यांचा भाऊ आहेत. ती जमीन आधी सलीमच्या नावे ट्रान्सफर झाली. हिंदू देवस्थानाची जमीन आणि मुस्लिमाच्या नावे, आणि मग पाटणकरांच्या नावावर झाली, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
श्रीधर पाटणकर हे का बोलत नाहीत. श्रीधर पाटणकर याच्या नावावर जमीन सलीम याच्या नावावरुन ट्रान्सफर झाली आहे. मी तक्रार दिलेली नाही. मी फक्त जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली, असं किरीट सोमय्या म्हणाले.
कोविड घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत एका शब्दानं बोलत नाहीत. यासंदर्भातील कागदपत्र मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. पुण्यात कंपनी ब्लॅकलिस्ट करुन त्यांना कंत्राट देणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. मूळ मुद्दा कोविड घोटाळ्याला ठाकरे सरकार आणि संजय राऊत प्रचंड घाबरलेले आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
रश्मी ठाकरेंच्याविरोधात सोमय्यांना दारुगोळा कुणी पुरवला?
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, प्रताप सरनाईक हे मी ‘आरटीआय’ करताना माझ्या बाजुला येऊन बसले. त्याचे सगळे फोटो त्यांनीच काढले. ते व्हायरल केले. मात्र, माझ्यावर कारवाईचा इशारा दिला गेला. माहिती अधिकाराअंतर्गत मी मंत्रालयात गेलो, तर तुम्ही नाटक केलं. २०१७ मध्ये हेच सगळं तुम्ही मेधा सोमय्यांच्या नावानं सांगितलं होतं. आता पाच वर्ष झाली, तेव्हा तुम्ही का सांगितलं नाही, असा सवाल त्यांनी केला. किरीट सोमय्या, मेधा सोमय्या यांच्या सामाजिक कामाची चौकशी करू असं म्हणालात, मग चौकशी का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, करा आमची चौकशी, पण नाटकं करू नका. राऊत तुम्ही काल जे सांगितलं, तसंच पाच वर्षांपूर्वी मेधाच्या नावे म्हणाला होता. आम्ही खोटं केलेलं नाही, पण ठाकरेंकडे जर त्यासंबंधी अधिक माहिती राऊतांनी दिली असेल, तर खुशाल चौकशी करा. कोविड घोटाळ्याची चौकशी का करत नाही आहात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सोमय्या पुढे म्हणाले की, कालपण मी ट्वीट केलं, पण तुम्ही कुणी दाखवलं नाही. एक मिनिट एक मिनिट. आम्ही दमडीची कुठं काही चूक केलेली नाही. नंबर वन. याच बाबत २०१७ मध्ये मेधाच्या नावे छापून आलं. विधानसभेत गेलं वर्षभर. 20 वर्षांपूर्वी शौचालय बांधलं, त्याची नाटकं केली. यांच्याकडे कागद असेल, तर आमची चौकशी करावीच. आम्ही अपील पण नाही करणार, असेही ते म्हणाले.