मुंबई/कराड : पोलिसांच्या विरोधानंतरही कोल्हापूरकडे निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये उतरवण्यात आलं आहे. किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून मुंबईवरुन कोल्हापूरकडे जात होते. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. आता सोमय्या कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत.
दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार पहाटे पावणे पाच वाजता माजी खासदार किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कराड येथे उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. किरीट सोमय्या सध्या शासकीय विश्रामगृहावर आहेत. पत्रकार परिषद आटोपून सोमय्या मुंबईसाठी रवाना होणार आहेत.
हसन मुश्रीफ यांचीही पत्रकार परिषद
किरीट सोमय्यांच्या पवित्र्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. हसन मुश्रीफ आज सकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हसन मुश्रीफ पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडतील. हसन मुश्रीफ सध्या मुंबईत असल्याचं सांगण्यात येत आहे.