लाखो विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले : आ. राम सातपुते

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी भाजपा सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एमपीएससी उत्तीर्ण तरूण स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले. भाजपा आमदार राम सातपुते यांनी या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन करून सरकारचा जोरदार निषेध केला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राम सातपुते म्हणाले की, वरळी केम छो बोलणं सोप्पं आहे. पण विद्यार्थ्यांवर बोलायला वेळ नाही. हे सरकार निर्लजम्म सदासुखी आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्यात त्यांना नियुक्त्या द्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नाही. यांना केवळ त्यांच्या लेकराबाळांची चिंता आहे. विद्यार्थ्यांची यांना काही देणं घेणं नाही. सरकारला फक्त वसुली चालली पाहिजे. वाझेसारखे अधिकारी जगले पाहिजेत, विद्यार्थी मेले पाहिजेत, हे सरकार पळपुटे आहे. हेच त्यांचे धोरण आहे अशी टीका त्यांनी केली.
त्याचसोबत लाखो विद्यार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. काहीतरी नाटकं करून विलंब करत आहे. पार्थ पवार, रोहित पवार, आदित्य ठाकरे यांची चिंता सरकारला आहे. २ दिवसांचे अधिवेशन घेतले. सरकार तोंडावर पुस्तक मारायला आणली आहेत. ठाकरे सरकारनं विद्यार्थ्यांचे वाटोळे केले आहेत. विद्यार्थी आत्महत्या करतंय पण सरकार गप्प बसलंय. विद्यार्थी दिवसभर राबराब करतात. स्वप्निलची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे. ४१३ विद्यार्थी एमपीएससी परीक्षा पास होऊन नियुक्त्या नाहीत. स्वत:ची लेकरंबाळ आमदार, खासदार झाली पाहिजेत मग महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल आमदार राम सातपुते यांनी विचारला.
वीजबिलही फाडलं
वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आमदार राम सातपुते तर थेट विधानभवनात कृषी पंप घेऊन आले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असतानाच त्यांनी वाढीव वीजबिल फाडून सरकारचा निषेध नोंदवला. सरकारने वीज कनेक्शन तोडणी न थांबविल्यास कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशाराच त्यांनी दिला.
भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी आज अनोखे आंदोलन केलं. सातपुते यांनी अंगात निषेधाचा फलक असलेलं बॅनर घातलं. त्यानंतर मोटरसह कृषीपंप हातात घेऊन ते विधान भवन परिसरात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या वीज बिलाला माफी मिळालीच पाहिजे, वीज कापणी रद्द करा अशी मागणी सातपुते यांनी केली. यावेळी सातपुते यांनी वीजबिल फाडून सरकारचा निषेधही नोंदवला. सातपुते यांच्यासह भाजपच्या सर्वच आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर येऊन जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.
त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यावर जमले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राम सातपुते, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या सर्वच आमदारानी ठिय्या आंदोलन सुरू करून जोरजोरात घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. सातपुते आणि भाजप आमदारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सातपुते यांना कृषीपंप घेऊन विधानभवनात जाण्यापासून रोखलं.
यावेळी सातपुते यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारने अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. आता वसूलीसाठी शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. या सरकारनेही सावकारीच सुरू केली आहे, अशी टीका करतानाच वीज बिल माफ नाही केलं तर हा कृषीपंपच सरकारच्या डोक्यात हाणू, असा इशारा सातपुते यांनी दिला.




