मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी बदलल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. आम्ही पहिली १२ नावं मंत्रिमंडळाने दिली. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं, असं अजित पवार म्हणाले.
राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना आता विधानपरिषदेवर घेता येतं की नाही, याबाबतचा नियम आता महाविकास आघाडीकडून तपासला जात आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, नाव बदललं ही चर्चा मी माध्यमात बघितली. नजिकच्या काळात पराभूत झालं तर नियुक्त केले जात नाही असे म्हणतात. पण अरुण जेटली पराभूत झाले तेव्हा त्यांना मोदी सरकारने राज्यसभेवर घेतलं. राज्यपाल नियुक्त करता येत नाही असं आम्हाला सांगण्यात आले, ते आम्ही तपासतो आहे.