कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामऱ्यांच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने एकही गडी न गमावता १२९ धावा केल्या आहेत. ५७ षटकांमध्ये न्यूझीलंडने हा धावफलक उभारलाय. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ३४५ धावांवर आटोपला. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल, रविंद्र जाडेजा यांनी पहिल्या डावात केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने पदार्पणात शतक झळकावताना १०५ धावा केल्या, तर शुभमन गिल ५२, रवींद्र जाडेजा ५० आणि आर आश्विननं ३६ धावा केल्या.
न्यूझीलंड संघानं कानपूर कसोटीत जबरदस्त कमबॅक केले. ४ बाद २५८ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरूवात करणाऱ्या भारतीय संघासाठी श्रेयस अय्यरनं शतकी खेळी केली. पण, त्याला किवी गोलंदाज टीम साऊदीकडून सडेतोड उत्तर मिळाले. रवींद्र जडेजा व अय्यर यांची १२१ धावांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. तीन अष्टपैलू खेळाडू असूनही फक्त आर अश्विननं काहीसा संघर्ष दाखवला. आजच्या दिवसात भारताचे ६ फलंदाज ८७ धावांवर माघारी परतले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा विल यंग व टॉम लॅथम या सलामीवीरांनी सॉलिड सुरुवात केली.
४ बाद २५८ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊदीनं धक्के दिले. त्यानं रवींद्र जडेजा ५० धावांवर त्रिफळाचीत केले. शुबमन गिल (५२) व अजिंक्य रहाणे (३५) यांच्याप्रमाणेच चेंडू जडेजाच्या बॅटीला लागून यष्टींवर आदळला. जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसनं आक्रमक खेळ केला. श्रेयस १७१ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांवर माघारी परतला. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. वृद्धीमान सहा (१) व अक्षर पटेल (३) हेही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाले. आर अश्विनने संघर्ष कराताना ३८ धावा करून संघाच्या धावसंख्येत भर घातली. अजाझ पटेलनं त्याची विकेट घेतली. पहिल्या दिवसाच्या ४ बाद २५८ धावांवरून आज टीम इंडियाचे सहा फलंदाज ८७ धावांत माघारी परतले. न्यूझीलंडनं चांगला कमबॅक करताना टीम इंडियाला ३४५ धावांवर रोखले. साऊदीनं ६९ धावा देताना ५ बळी टिपले. कायले जेमिन्सननं तीन व अजाझ पटेलनं दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारताला सडेतोड उत्तर दिले आहे. विल यंगनं भारतातील पहिले व कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या फिरकीपटूंसह उमेश यादव व इशांत शर्मा हे जलदगती गोलंदाजही किवी सलामीवीरांसमोर हतबल झाले. या जोडीनं ५० हून अधिक षटकं खेळून काढताना विक्रमाला गवसणी घातली. २०१६ मध्ये विशाखापट्टणम येथे इंग्लंडच्या हमीद हमद व अॅलिस्टर कूक यांनी ५०.२ षटकं खेळून काढताना ७५ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर भारतात परदेशी सलामीवीरांकडून ५० हून अधिक षटकं खेळून काढण्याची आजची पहिलीच वेळ ठरली.
टॉम लॅथमनंही कसोटीतील २१वे अर्धशतक १५७ चेंडूंत पूर्ण केले. दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडनं एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या आहेत. यंग ७५ आणि लॅथम ५० धावांवर नाबाद आहेत. भारताकडे अजूनही २१६ धावांची आघाडी आहे.