मुंबई: दादरा नगर हवेली येथील लोकसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर आता शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. प्रथमच राज्याबाहेरील निवडणूक जिंकून शिवसेनेचा खासदार दिल्ली जात आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी ४७ हजारांहून अधिक मतांनी भाजप उमेदवाराला पराभूत केले आहे. यानंतर आता शिवसेना सीमोल्लंघन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देशातील अन्य राज्यांत निवडणूक लढवण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
केंद्रीय नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले जात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारला असता, मुख्यमंत्री वेगवेगळ्या सर्व्हेत टॉप फाईव्हमध्ये येत असतात. मुख्यमंत्री सर्व मित्र पक्ष आणि प्रशासनाला सोबत घेऊन काम करत आहेत. दादरा नगर हवेलीतील शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता. अन्यायाविरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.
दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाहीविरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दादरा नगर हवेलीमध्ये डेलकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या.