Top Newsआरोग्य

चिंताजनक ! महाराष्ट्रात २४ तासांत ३६ हजार २६५ कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या पार; होम क्वारंटाईन कालावधी ७ दिवसांचा

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्ये झपाट्यानं वाढत असून गुरुवारी दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णवाढीसह राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता १ लाख १४ हजार ८४७ इतका झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ३६,२६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ८,९०७ रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज ७९ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यासह ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ८७६ इतका झाला आहे. तर बरं झालेल्या रुग्णांचा आकडा ३८१ इतका झाला आहे.

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या पार

राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत नोंदवली जात आहे. राज्यातील ३६ हजारांच्या रुग्णसंख्येत २०,१८१ रुग्ण तर एकट्या मुंबईतून आढळून आले आहेत. मुंबईत सध्या ७९,२६० सक्रिय रुग्ण आहेत. एका दिवसात मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ५ हजारांनी वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा आजचा पॉझिटिव्हिटी दर तब्बल २९.९० टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

मुंबईत बुधवारी तब्बल १५,१६६ नवे कोरोना रुग्ण आढलले होते. गुरुवारी हाच आकडा थेट २० हजारांच्यावर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी परिसरातून आज १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दादरमध्ये २२३ आणि माहिम परिसरातून ३०८ रुग्णांची वाढ झाली आहे.

मुंबईत होम क्वारंटाईन कालावधी आता ७ दिवसांचा

सहव्याधी असले तरी लक्षणविरहित अथवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घरात उपचार घेता येणार आहे. तसेच पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सातव्या दिवशी व सलग तीन दिवस ताप नसल्यास या रुग्णांचा होम क्वारंटाईन कालावधी संपणार आहे. लसीकरण पूर्ण झालेला व्यक्ती कोविड प्रतिबंधक नियम पाळून २४ तास या रुग्णांची काळजी घेऊ शकणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील सुधारित परिपत्रक गुरुवारी रात्री पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

मुंबईत दररोज २० टक्के कोविड रुग्ण वाढत आहेत. मात्र यामध्ये लक्षणविरहित रुग्णांची संख्या ९० टक्के असल्याने केवळ पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या सध्या ८० हजारांच्या आसपास असली तरी यापैकी पाच हजार रुग्णालयात दाखल आहेत. तर लक्षणे नसलेली, सौम्य लक्षणे अथवा अति जोखमीच्या गटातील असे सुमारे तीन लाख ३२ हजार नागरिक होम क्वारंटाईन आहेत. अशा रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत पालिकेने मार्गदर्शन केले आहे.

सदर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान सातव्या दिवशी व सलग तीन दिवस ताप येत नसल्यास व त्यापुढेही त्यांनी मास्क लावून ठेवल्यास त्यांचा विलगीकरण कालावधी पूर्ण होणार आहे. अशावेळी त्यांना पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. तसेच अति जोखमीच्या गटातील व्यक्तींची विलगीकरण कालावधीही सात दिवसांनी पूर्ण होणार आहे. मात्र या कालावधीत त्यांच्यामध्ये कोणती लक्षणे आढळून आल्यास पाचव्या व सातव्या दिवशी त्यांना चाचणी करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button