कुडाळ : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मुंबईत भाजपनं शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर झालेल्या राड्याचं उदाहरण ताजं असतानाच शिवसेनेनं भाजपला डिवचण्यासाठी अनोखी ऑफर जाहीर केली. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली होती. सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लीटर पेट्रोल आणि भाजपचं सदस्यत्व ओळखपत्र दाखवणाऱ्या प्रत्येकी १ लीटर पेट्रोल मोफत वाटपाचा कार्यक्रम वैभव नाईक यांनी जाहीर केला होता. तसं ट्विटच वैभव नाईक यांनी केलं. विशेष म्हणजे हे पेट्रोल वाटप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर होणार होतं. त्यामुळे भाजपला धोबीपछाड देण्याचा कार्यक्रमच वैभव नाईक यांनी आखला होता.
पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजपला डिवचण्याचं वैभव नाईक यांचं हे आंदोलन आता उलटताना दिसत आहे. कारण वैभव नाईक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलेल्या कुडाळ येथील भारत पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनानं पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचा या पेट्रोल पंपावरील नियोजित पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. मग आमदार वैभव नाईक यांनी दुसऱ्या पेट्रोल पंपावर स्वस्त दरात पेट्रोल वाटपाचा निर्धार केला. तर त्याही पेट्रोल पंप व्यवस्थापनानं आता पोलीस स्टेशन गाठलं आहे. पेट्रोल-डिझेल वाटपात आम्हाला कोणताही राजकीय अभिनिवेश ठेवायचा नाही अशी भूमिका पेट्रोल पंप मालकांनी घेतली आहे. त्यामुळे वैभव नाईक यांचं भाजपला डिवचण्यासाठीचं अनोखं आंदोलन आता त्यांच्यावर उलटले आहे.
सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री
मोफत पेट्रोलच्या राजकारणातून सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.
वैभव नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा कणकवली, वागदेमध्ये पेट्रोल पंप आहे. परंतु वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून आमदार आहेत. जो नारायण राणेंचा मतदारसंघ आहे. तेथून पहिल्यावेळी ते नारायण राणेंना हरवून निवडून आले होते. नाईकांचा पेट्रोल पंप त्यांच्या मतदारसंघात नसल्याने राजकीय उद्देशासाठी त्याचा ते वापर करू शकत नाहीत. तो पेट्रोल पंप नारायण राणेंचे आमदार पूत्र नितेश राणेंच्या मतदारसंघात आहे. मालवण शहरात एकच पेट्रोल पंप आहे, तो देखील राणेंच्याच मालकीचा आहे. यामुळे वैभव नाईक यांचे डावपेच फोल ठरल्याची चर्चा आहे.
निलेश राणेंचा हल्लाबोल
शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 19, 2021
नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सकाळी राडा झाला. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी लगेचच ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.