Top Newsराजकारण

मोदींच्या ‘नमस्ते ट्रम्प’मुळे भारतात कोरोनाचा स्फोट; नवाब मलिक यांचा पलटवार

ज्या राज्यात निवडणुका त्याची उचलायची तळी, राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला

मुंबई : कोरोना काळात महाराष्ट्र सरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला. ‘नमस्ते ट्रम्प’च्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला. त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नाही असं सांगितलं होतं. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आलं. ट्रम्पना प्रोत्साहन देण्यात आलं आणि तेथूनच देशभरात कोरोना पसरला, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर उत्तर दिले. त्यावेळी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केली आणि कोरोना देशभरात काँग्रेसनेच पसरवला, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला. पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत असताना काँग्रेसवाले महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटं वाटत होते, हे खूप मोठं पाप असल्याचंही मोदी म्हणाले. त्यावर, गुजरातमधील नमस्ते ट्रंप कार्यक्रमामुळेच देशात कोरोनाचा स्फोट झाल्याचा पलटवार महाविकास आघाडी सरकारतर्फे नवाब मालिकांकडून करण्यात आला.

मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीटे दिली. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली, कारण तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. मग आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या. परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोकं भोगत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

ज्या राज्यात निवडणुका त्याची उचलायची तळी, राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला

फक्त आणि फक्त पंजाब, युपी, उत्तराखंड येथील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून देशाच्या प्रमुखांनी संसदेत महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्यांनी कोरोना काळातील फोटो शेअर केले आहेत. तर, राष्ट्रवादीनेही मोदींना महाराष्ट्रद्रोही बीजेपी या हॅशटॅगखाली प्रत्युत्तर दिलंय.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम पंजाब, उत्तराखंडमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. कोरोनाचा पसार होण्यास मोदींनी महाराष्ट्राला जबाबदार धरल्याने महाविकास आघाडीचे नेते चांगलेच संतापले आहेत.

मोदींच्या भाषणानंतर ट्विटरवर महाराष्ट्रद्रोही बीजेपी हा हॅशटॅग सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या हॅशटॅगने एनसीपीच्या अकाऊंवरील एक ट्विट रिट्विट केलं आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ज्या राज्यात निवडणूक त्याची उचलायची तळी आणि महाराष्ट्राच्या बदनामीचे धोरण एककल्ली. पण, महाराष्ट्राची खोटी बदनामी करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे लक्षात घ्या आणि संसदेत बोलताना तरी भाजपच्या स्टार प्रचारकाच्या भूमिकेतून बाहेर या, असे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे. जयंत पाटील यांनी हे ट्विट शेअर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button