गोपीचंद पडळकरांसारखी बांडगुळं वाढत आहेत; शिवसेना आ. मनिषा कायंदेंचा हल्लाबोल
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार टीका केलीय. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जातीपातीवर मतं मागितली नाहीत. कधी जातीचं राजकारण केलं नाही. मोठ्या माणसांची नावं घेतली की आपलं नाव मोठं होतं असं पडळकरांना वाटतं. गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढत आहेत, अशी घणाघाती टीका मनिषा कायंदे यांनी केलीय.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असा टोलाही पडळकरांनी लगावला होता.
तत्पूर्वी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या आव्हानावरुन टोला लगावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असंच वक्तव्य केलं होतं. ते मला चांगलं आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय.