मुक्तपीठ

सेना-काँग्रेस आमने-सामने

- दीपक मोहिते

महाविकास आघाडीत प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व सेनेमधून सध्या विस्तव जात नाही. संजय राऊत यांचा वाचाळपणा आणि आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका निर्णयामुळे काँग्रेसने थेट राज्यपालांना हस्तक्षेप करण्यासाठी साकडे घातले आहे.

काही दिवसांपूर्वी सेनेचे प्रवक्ते,खा.संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करा, अशी मागणी केली. त्यामुळे काँग्रेसजनांमध्ये संतापाची लाट उसळली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राऊतांनी ही संपुआमध्ये घटक नसलेल्या बाहेरच्या लोकांनी नसती उठाठेव करू नये, असा सल्ला दिला होता. ते प्रकरण शमत नाही तोच राज्याचे पर्यावरण व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील सेनेच्या ४३ नगरसेवकांच्या प्रभागात सौंदर्यकरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या फंडातून ३ हजार ६९३ कोटी रु.उपलब्ध केले. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.जनार्दन चांदूरकर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ही बाब घटनाबाह्य असून या प्रकरणी राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. असा निधी उपलब्ध करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. त्यासाठी अर्थविभागाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागणी सादर करावी लागते. अर्थमंत्र्यांना याची माहिती नसल्यास सरकार अडचणीत येऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

यापुढे जाऊन प्रा.चांदूरकर यांनी सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा, हे तत्व मान्य नसल्यामुळे तसेच ही बाब घटनाबाह्य असल्यामुळे राज्यपालांनी तातडीने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्यास मंजुरी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान भाजप नेते माजी खा. निलेश राणे यांनी, ज्या मंत्र्याला अर्थसंकल्प कळत नाही, तो कॅबिनेट व पालकमंत्री आहे, अशा शब्दात खिल्ली उडवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button