पुणे : शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याबाबत स्पष्टीकरण देतानाही पाटील यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांची बेधडक वक्तव्ये आणि वादाची मालिका सुरुच आहे. पुन्हा एकदा त्यांनी वाद निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय? याच वक्तव्याला घेऊन कुणीतरी निदर्शनं करणार होतं. मला धमकी आली, मात्र, हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही, असा इशाराही पाटील यांनी दिला.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 14, 2021
राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी माझं तिकीट कापलं असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत ते तिकीट आणि व्होट बँक पक्षाची असते असं म्हटलं. तसंच ही व्होट बँक वर्षानुवर्षे मेहनत घेत विकसित करण्यात आलेली असल्याचं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.
चंद्रकांत पाटलांवर टीका
पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती आहे. व्होट बँकेच्या हीत राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता? शिवरायांची तुलना मोदींशी? आदित्यनाथ व विजय गोयल यांनी मोदींची तुलना शिवरायांशी केली होतीच. ‘आजके शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक भाजपनेच काढले. हे जाणीवपूर्वक करत आहेत. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजप कुविचारांचे. त्यामुळे तुलना पातकच आहे. तत्काळ माफी मागा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती.