राजकारण

महाराष्ट्रातले उद्योग पश्चिम बंगालला घेऊन जाण्यासाठी शिवसेनेची ममतांना मदत : शेलार

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्या. सर्वप्रथम त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना ‘जय मराठा, जय बांगला’ असा नारा देत सर्वांना आश्चर्यचकीत केले. हा नवा नारा भाजपविरोधी राष्ट्रीय राजकारणातील आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी या भेटीवरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राचे राजशिष्टाचार, पर्यटन मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, सरकार या भेटीतील चर्चा का लपवते? असा सवाल शेलार यांनी केला आहे. तसेच विरोधकांना चिरडणाऱ्या “बंगाली हिंसेचे” धडे तर गिरवले जात नाही ना? असं म्हणतं निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. ममता दीदी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय… पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण… महाराष्ट्रातील उद्योगांना, दीदी पश्चिम बंगालमधे या असे आमंत्रण घेऊन ही त्या आल्या आहेत का? असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सिद्धीविनायक दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. त्यांच्यासाठी प्रार्थना केली. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. त्यासाठी मी मंदिर समिती, ट्रस्टी आणि पुजारी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानते. मला इथे येऊन बरे वाटले. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते, असे सांगत बॅनर्जी यांनी जय मराठा, जय बांगला हा नारा दिला. सिद्धिविनायक दर्शनानंतर बॅनर्जी यांनी शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली. बुधवारी सायंकाळी ममता बॅनर्जी या मुंबईतील बड्या उद्योजकांना भेटून त्यांना पुढील वर्षी एप्रिल महिन्यातील बंगाल जागतिक व्यापार परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण देणार आहेत.

काँग्रेसला ना इज्जत, ना किंमत

शेलार यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना अ‍ॅड. आशिष शेलार यांनी काँग्रेसला ना इज्जत, ना किंमत आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसवर केली आहे.

आशिष शेलार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. दुर्दैवाने काँग्रेसला ना स्थिती, ना स्थान, ना वेळ, ना काळ, ना इज्जत ना किंमत आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला काहीही ते द्यायला तयार नाहीत. पण आम्हाला काय पडलंय…काँग्रेसने फरफटायचंय, झुकायचंय, नाक घासायचंय, त्यांचा प्रश्न आहे, असं शेलार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button