यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
यवतमाळ : शिवसेनेचे पदाधिकारी यवतमाळ बाजार समिती संचालक सुनील डिवरे यांची आज त्यांच्या राहत्या घरासमोरच गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. डिवरे हे भांब राजा गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच होते. यंदा त्यांची पत्नी अनुप्रिया डिवरे या सरपंच आहेत.
सुनील डिवरे हे सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्यांच्या घरी असताना त्यांच्यावर घरासमोर अचानकपणे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यात सुनिल डिवरे यांच्या छातीत आणि पोटात दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. सुनील डिवरे यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार झाल्याचीही माहिती आहे. यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली आणि कुणी केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास करीत आहेत.
भांब राजा सर्कलमध्ये सुनील डिवरे यांचा भरपूर दबदबा होता. या घटनेनंतर भांब राजा गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. हत्येच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पवन नामक तरुणाशी डिवरे यांचा व्यावसायिक संघर्षातून वाद झाला होता. याच वादातून डिवरे यांची हत्या झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते. सुनील डिवरे आणि पवन या दोघांचेही गावाच्या हद्दीत ढाबे आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. रुग्णालयामध्ये नातलग आणि परिचित व्यक्तींनी मोठी गर्दी केली आहे.