संजय राऊत यांच्यावर चित्रपट निर्मात्या महिलेचे गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर एका चित्रपट निर्मात्या डॉक्टर महिलेने गंभीर आरोप केले आहेत. 2015 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला बाळकडू चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनीच संजय राऊतांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
स्वप्ना पाटकर यांनी आरोप केलाय की, शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून त्यांना शिवीगाळ करत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत.याबाबत थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. पत्रात त्यांनी लिहिले आहे की, त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत अनेक प्रकरणांत चौकशीसाठी बोलावले जाते आणि विनाकारण त्रास दिला जातो. मला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.
त्यांनी लिहिले की, ‘शिवसेना भवन’च्या तिसऱ्या मजल्यावर बोलावून त्यांच्या नातेवाइकांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना माझ्याशी संबंध तोडण्यासाठी भाग पाडण्यात आले. सोबतच हे सर्व संपवण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या मागणीचा आरोपही त्यांनी केला आहे. स्वप्ना यांनी आरोप केला आहे की, खा. संजय राऊत यांच्या इशाऱ्याने पोलिसांनी त्यांच्यावर ‘धंदा’ केल्याचा आरोपही केला होता. त्यांनी आरोप केलाय की, 2017 मध्ये स्वत: संजय राऊत यांनी फोनवर धमकी दिली आणि 2018 मध्ये भाडोत्री माणसाला त्यांचा पाठलाग करायला लावला. स्वप्ना सांगतात की, त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सना हॅक करून कधी सुसाइड नोट, तर कधी अश्लील कंटेंट टाकण्यात आला, परंतु पोलिसांनी स्पष्ट म्हटले की, संजय राऊत यांच्याविरुद्ध ते FIR नोंदवू शकत नाहीत.
स्वप्ना या पेशाने एक साइकोलॉजिस्ट आहेत. ‘द रॉयल मराठी एन्टरटेन्मेंट’ नावाच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकही आहेत. 2013 मध्ये त्यांनी ‘जीवन फंडा’ हे पुस्तकही लिहिले आहे. मुंबईत ‘सॅफरन 12’ नावाचे एक मल्टी कुझिन फॅमिली रेस्तरांही चालवतात. मार्च 2013 मध्ये झालेल्या रेस्तरांच्या उद्घाटनात अभिनेता संजय दत्त, संगीतकार बप्पी लाहिरी, गायक सुरेश वाडेकर यांच्याशिवाय दिलीप ताहिल आणि मुरली शर्मा यांच्यासारखे ज्येष्ठ चरित्र अभिनेतेही पोहोचले होते. सर्वात मोठी बाब म्हणजे, ‘सामना’मध्ये त्या ‘कॉर्पोरेट मंत्र’ आणि ‘आठवड्याचा माणूस’ या नावाने कॉलम लिहायच्या.