आ. सुहास कांदे धमकीप्रकरणाला नाट्यमय कलाटणी; खोट्या आरोपांबद्दल बदनामीचा दावा ठोकणार : अक्षय निकाळजे
मुंबई : शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी आल्याचा आरोप केला होता. मात्र, आता या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. उलट खोट्या आरोपांबद्दल आमदार कांदे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे मंगळवारी म्हटले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्रही दिले होते. या प्रकरणाला बुधवारी एकदम कलाटणी मिळाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. यावर निकाळजे म्हणाले की, आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही. त्यामुळे मी आमदारांचीच तक्रार करणार आहे. त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केले. माझा भुजबळांचा काहीही संबंध नाही. कांदे विनाकारण पोलिसांची दिशाभूल करत आहेत. या प्रकरणी आम्हाला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करू. याबाबत गृहमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे ११ सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून ही शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरून तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल, असं सांगितलं. मात्र, दोघांतली खडाजंगी चर्चेचा विषय ठरली होती.