Top Newsराजकारणशिक्षण

शरद पवारांनी ‘रयत’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; शिवसेनेच्या आमदाराची मागणी

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कोरेगावचे शिवसेना आ. महेश शिंदे यांनी केली आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहिली होती. त्यामध्ये त्यात महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, असं म्हटलं. मात्र, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली, असा आरोप आ. महेश शिंदे यांनी केलाय. दरम्यान, शरद पवारांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती हे तपासा, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांनी केलाय.

महेश शिंदे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून घेतलं जातं. याचे दुःख वाटते. रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने पैसे मागितले जातात. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतेचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.

शरद पवारांनी वंशपरंपरेने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिलं, तर रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशांना या संस्थेवर घेतले. त्यामुळे जनतेचा विचार करून शरद पवार रयतचे अध्यक्षपद सोडतील, अशी खोचक टीका महेश शिंदे यांनी केली.

महेश शिंदे म्हणाले, खासदार उदयनराजेंना रयत’च्या कार्यकारी मंडळावर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात घेण्यात आली. हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. एकाच परिवारातील ९ जण रयत संस्थेमध्ये कार्यकारिणीत आहेत. त्यांचे रयतसाठी योगदान काय? असा सवालही महेश शिंदे यांनी उपस्थित केला.

आ. शशिकांत शिंदे यांचा पलटवार

आ. महेश शिंदे यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, स्पर्धेच्या युगातही रयत संस्था टिकवण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी केले. शैक्षणिक स्पर्धेत दर्जा आणि सुविधा देण्याचे काम सरकारचे आहे. पण अनुदान असे कितीसे मिळते. त्यापेक्षा १२ ते १५ कोटी रुपयांचा निधी केवळ शरद पवार यांच्या आवाहनावरून मिळतो. संगणकापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक प्रकल्प शरद पवारच अध्यक्ष झाल्यापासून या संस्थेत सुरू केले आहेत.

शासकीय अनुदान व्यतिरिक्त निधी उभा करण्याची किमया या महाराष्ट्रात त्यांच्याच माध्यमातून झाली आहे. अनेक लोक इतर संस्थेचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचे योगदान आणि शरद पवार यांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपण किती बोलतो याचे भान ठेवावे. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button