राजकारण

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी आज ६ जिल्ह्यांत मतदान

मुंबई : कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील ६ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. झेडपीच्या ८५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी मतदान होत आहे. आज मतदान तर उद्या मतमोजणी होणार आहे. आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या ३१ मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विखुरलेल्या १ हजार ११५ मतदान केंद्रांवर आज ६ लाख ९६ हजार पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावून ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणाला हे स्पष्ट करणार आहे. आज होणार्‍या या पोटनिवडणुकीसाठी आज नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तहसील कार्यालयातून पोलींग पार्टीज रवाना होत आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी केली असली, तरी शिवसेनेने वेगळी चूल मांडत अकरा ठिकाणी उमेदवार उभे केल्याने बहुतांशी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. काही ठिकाणी दमदार बंडखोरांनी निवडणूक बहुरंगी ही बनवली आहे.. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या अनेक सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या पोटनिवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून आपले बहुमत पुन्हा साध्य करण्याचे आवाहन काँग्रेस समोर आहे.. तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपसमोर या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आपली सदस्य संख्या वाढवण्याचे आव्हान आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना शहरातील केंद्रीय विद्यालय या जवळील धान्य गोडाऊन येथे साहित्याचे वाटप करण्यात आले, धुळे जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि २८ गणांसाठी पोटनिवडणूक पार पडत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन नियोजन करण्यात आले आहे, धुळे जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी ४३ तर २८ गणांसाठी ७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या १५ तर पंचायत समित्यांच्या १४ जागांसाठी मतदान होणार आहे . ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या जागा रद्द झाल्या असून याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसलेला पाहायला मिळाला . राष्ट्रवादीच्या १५ पैकी ७ जागा रद्द झाल्या असून शिवसेना ३ , भाजप ५ तर माकपची एक जागा रद्द झाली होती . जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडी सत्तेत असून शिवसेनेकडे अध्यक्ष तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद आहे . जिल्हा परिषदेत एकूण ५७ जागा असून बहुमतासाठी २९ जागांची गरज आहे. या पोटनिवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जागा कमी जास्त झाले तरी जिल्हा परिषदेतील सत्तेत फरक पडणार नसला तरी महाविकास आघाडीत फूट पडल्यास येथे सत्ता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या पोटनिवडणुकीत बहुतांशी जागांवर सेना भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांची! खासदारांच्या हट्टापायी जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील वणई गटाचा शिवसेनेचा विद्यमान उमेदवार डावलून खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांना उमेदवारी दिली आहे. त्यामूळे या गटातील शिवसैनिकां मध्ये नाराजीचा सुर आहे.तर भापज,सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस अशी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे जर का खासदार गावित यांच्या चिरंजीवाला येथे चुकून पराभव स्वीकारावा लागला तर त्याचे परिणाम थेट खासदार गावित यांच्या पुढील कारकीर्दीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २७ गणांसाठी मतदान होत आहे. वाशीम जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाची यासाठी तयारी झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button