Top Newsराजकारण

भाजपला देशात ऐक्य नको हे शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वी सांगितलं होतं : संजय राऊत

मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला देशात ऐक्य नको हे शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वीच सांगितले होते, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘नेमकचि बोलणे’ हे पुस्तक आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला हवे, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.

महाविकास आघाडीचा जो आपण ग्रंथ निर्माण केला आहे त्याला भगवे कव्हर आपण घातले आहे, त्याबद्दल आभारी आहे. हे सरकार अवघा रंग एकची झाला असे आहे. नेमकचि बोलणें हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला हवे. कारण महाराष्ट्र हा सतत देशाला काही विचार देत असतो. शरद पवार यांच्या ६१ भाषणाच्या या पुस्तकाची प्रत आपण पंतप्रधानांना देऊ. नेमकचि बोलणें याची फोड करुन त्यांना सांगू, असे संजय राऊत यांनी सांगितले.

भाजप देशाचे तुकडे करत आहे

आपल्या देशामध्ये जे विकृत राजकाराण सुरू आहे, त्यावरसुद्धा शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहे. भाजपला देशाचे ऐक्य नको आहे, हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की, भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे, हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, सोशल मीडियावर शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली, त्यावरुन फार टीका करण्यात आली. पण त्यांना बसण्यासाठी खुर्ची का दिली, हे समजून घ्यायचे असेल, त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते, त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर कळेल माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे, असे स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी यावेळी दिले.

नावे लक्षात ठेवण्याच्या खुबीवर पवार यांनी सांगितला किस्सा

पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांच्या भाषणांचा काही भाग वाचण्यात आला. त्यानंतर त्या त्या वेळी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अभिनेता, कवी किशोर कदम यांनीही पवारांच्याबद्दलचा किस्सा सांगितला. त्यानंतर किशोर कदम यांनी तुम्ही सर्वांना नावानिशी कसे ओळखतात?, असा सवाल शरद पवारांना विचारला.

किशोर कदम यांच्या या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, राजकारणात फार कमी कष्टानं आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळतं, फक्त तुम्ही समोरच्या माणसाचं नाव लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातली होती. तिचं काहीतरी काम होतं. मी तिला म्हटलं, काय गं कुसूम मुंबईला कशी, काय चाललंय? तर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली काम होवो न होवो, अशी तिची भावना होती.

शरद पवार पुढे म्हणाले की, लोकांचे खूप छोट्या गोष्टीत सुख असते. म्हणूनच या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील. हे दोघे त्यांना कितीही जुना माणूस भेटला तरी ते त्यांचे नाव लक्षात ठेवायचे. अशा गुणांमुळे समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त होते. यश मिळते, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

२५ वर्षापूर्वी काय म्हणाले?; पवारांचं भाषण जसंच्या तसं

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी शरद पवारांचे २५ वर्षांपूर्वीचे एक भाषण वाचून दाखवले. पवारांचं हे भाषण आजही प्रासंगिक असल्याने बागाईतकर यांनी ते वाचून दाखवले. पवारांनी नागपूर येथे १८ एप्रिल १९९६ रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी हे भाषण केलं होतं. काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या प्रचारसभेतील हे भाषण आहे.

विदर्भ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मांडला जातो. स्वातंत्र्यापासून या भागातील जनतेने काँग्रेसवर मनापासून प्रेम केले आहे. काँग्रेसच्याच उमेदवारांना निवडून दिलं आहे. माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांच्या पाठीशी विदर्भातील जनता त्यांच्या पराभवानंतरही मजबूतीने उभी राहिली. इंदिरांजींवर अलोट प्रेम इथल्या जनतेने केले आहे. त्यांच्या पक्षाचा वारसा व विचार पुढे नेण्याचं काम विलास मुत्तेमवार साहेब आज समर्थपणे करत आहेत. त्यांना या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि विदर्भातील जनतेने काँग्रेस पक्षावर किती उदंड प्रेम केले आहे हे पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध करावे. अशी विनंती करण्यासाठी आज मी येथे आलो आहे.

अर्ध चड्डीवाल्यांनी धर्म आणि जातीयतेचे विष पेरले

नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहराला ऐतिहासिक, राजकीय आणि देशाचा केंद्रबिंदू या नात्याने भौगोलिकदृष्ट्याही मोठे महत्त्वाचं स्थान आहे. हिंदुत्वाचा विचार ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोपासला आणि वाढवला त्या संघाचे मुख्यालयही येथेच आहे. अर्ध चड्डीवाल्यांनी धर्म आणि जातीयतेचे विष माणसामाणसात पेरून या देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणली आहे. २७ सप्टेंबर १९२५ रोजी याच नागपूर शहरात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. १९३० पर्यंत ते सरसंघचालक म्हणून राहिले आणि दुसऱ्यांदा १९३१ मध्ये ते सरसंघचालक म्हणून निवडून गेले. ते १९४० पर्यंत राहिले. म्हणजे ते जवळपास १५ वर्षे डॉ. हेडगेवार हे संघाचे प्रमुख होते.

१९२० मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं. त्यानंतर महात्मा गांधींचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग झाला आणि हळूहळून गांधीजींचे नेतृत्व देशभर स्वीकारले जाऊ लागले. संघाची विचारसरणी महात्मा गांधींना कधीच पटली नाही आणि मान्यही झाली नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी आणि काँग्रेस संघटनेने जो ब्रिटिशांच्या विरोधात प्रचंड लढा दिला व संघर्ष केला. त्या लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधीही सहभाग नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकही संघवाला कधीही लढला नाही आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या रणांगणात उतरलाही नाही.

सावरकरांनी वारंवार माफीनामे दिले

जो संघ आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोडवे गातो आणि त्यांनाच फक्त देशभक्त मानतो, ते स्वातंत्र्यवीर ब्रिटीशांनी अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सोडावे आणि काळ्यापाण्याच्या शिक्षेतून मोकळीक मिळावी म्हणून वारंवार माफीनामा लिहून देत होते आणि पत्रं देत होते. ज्या सावरकरांना जेलमधून सोडवण्यासाठी महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केले हे सत्य जनतेला कधीही सांगितलं नाही. खरा इतिहास दडवून ठेवला जात आहे. सावरकरांच्या सुटकेसाठी महात्मा गांधी व्हॉइसरॉयला स्वत: जाऊन भेटले. इतकेच नव्हे तर मुंबईत झालेल्या काँग्रेस संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी ठराव मांडून तो मंजूर करायला लावला आणि काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही तसा ठराव मंजूर करून घेतला.

महात्मा गांधींच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम आणि सहानुभूती होती. म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी स्वत: एवढी धडपड केली. इतकेच नव्हे तर कारागृहातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीत जेव्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. तेव्हा गांधीजी आपली पत्नी कस्तुरबा यांना घेऊन सावरकर आणि त्यांच्या पत्नीला भेटायला रत्नागिरीत गेले होते. दोघांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले. गांधींचं मन किती मोठं आणि उदार होते हे संघवाले कधीही आपल्याला सांगत नाहीत. पण खरा इतिहास संघवाल्यांना दडवता येणार नाही. त्यांना कितीही प्रयत्न करू द्या पण सत्य हे कधी तरी ढळढळीतपणे कधी तरी जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही.

म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवा

ज्या नागपूर शहरात संघाची स्थापना झाली त्या संघ विचारधारेला नागपूरकर जनतेने कधीच उचलून धरले नाही. संघाच्या शाखा देशभर विस्तारल्या असतील. पण नागपूर आणि विदर्भातील जनतेने काँग्रेसची विचारधारा कायम उचलून धरली आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी केला हे कशाचे लक्षण मानायचे? संघाची विचारधारा पुढे नेण्यासाठी १९५१ रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. या जनसंघाचा पुढे भाजपचा झाला. आपली विचारधारा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या आणि स्वभावाच्या माणसांना जाती धर्माचे काम करता यावे म्हणून संघानेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अशा अनेक संघटना स्थापना केल्या.

या सर्वांचे एकच उद्दिष्ट हिंदू धर्माचं संघटन. धर्म एक असला तरी राष्ट्र एक राहू शकते हे खरे नाही. जगातील अनेक देशाची फाळणी एक धर्म असतानाही झाली आहे. त्यामुळे संघ भाजपने नुसता हिंदू हिंदू असा धोशा लावला तर भारतातील इतर धर्माची लोकं वेगवेगळा देश मागितल्या शिवाय राहणार नाही. आपल्याला देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवायची आहे. राष्ट्राची शकले होऊ द्यायची नाही म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे.

गोळवलकरांची भूमिका जातीयवादाला खतपाणी घालणारी

आज जो संघ आणि भाजप समान नागरी कायद्याचा आग्रह करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करतो. या कायद्याला विरोध करणारी मुलाखत १९७१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी दिली होती आणि ती संघाचेच मुखपत्रं असलेल्या ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झाली होती. हे भाजपच्या नेत्यांना आज आठवत नाही का?

या मुलाखतीत गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, समान नागरी कायदा करून समानता आणण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. विविधता हे भारताचे वैशिष्ट्ये आहे. विविधतेबरोबर संवादित्व असावे. समानता असण्याची गरज नाही. पाश्चात्य देशात राष्ट्रवादाबरोबर समान कायदे झाले असले तरी पाश्चात्य देशाची संस्कृती ही फार थोड्यावर्षाची आहे. आपली प्राचीन आहे. पाश्चात्य संस्कृती काल नव्हती, आज आहे. उद्या असणारही नाही. म्हणून तिचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपण समग्र कायद्याचा आग्रह धरू नये, गोळवलकर गुरुजींचा हा इतिहास कमालीचा फसवा आणि धादांत खोटा आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक धर्म, एक ध्वज आणि एक भाषा यांचा पुरस्कार करणार आणि दुसरीकडे मात्र कायदा मात्र समान असू नये असं सांगणार. यातील विसंगती भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे लक्षण आहे की गोळवलकर गुरुजींच्या एकंदर विचारसरणीचा तो अविभाज्य भाग आहे? याचे उत्तर कोण देणार आणि कधी देणार? काँग्रेसने मुस्लिम जातीयवादाला खतपाणी घातले असा आरोप भाजपवाले करतात. मग मुस्लिमांनी अलगतेने रहावे, त्यांनी स्वत:चे स्वतंत्र वैशिष्ट्ये ठेवावे, त्यांचा नागरी कायदा वेगळा असावा ही गोळवलकरांची भूमिका जातीयवादाला खतपाणी घालणारी नाही का?

भारतीय राज्य घटनेला तर संघाने सुरुवातीपासूनच विरोध केला. आपली राज्यघटना ही गुरुजींना अनेक देशांची गोधडी वाटते आणि हिंदू कोड हेही अन्य देशाच्या कायद्याचे बाड वाटते. मग राज्य घटना कशी असावी हे गोळवलकर गुरुजींना का सांगितली नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य होते. आणि अस्पृश्य माणूस राज्यघटना बनविण्याच्या मसुदा समितीचा अध्यक्ष होता हे गोळवलकर गुरुजींचे खरे दुखणे आहे का? कारण गुरुजींचा एकंदरीत दृष्टीकोण सामाजिक परिवर्तनाच्या विरुद्धचा आहे. गुरुजींच्या विचारांची होळी करायला आज आम्ही तयार आहोत, असं म्हणण्याचं धाडस संघ आणि भाजपवाले दाखवणार आहेत का? हा आज माझा त्यांना सवाल आहे.

रिपाइंच्या उमेदवारांना भाजपकडून आर्थिक रसद

गुरुजींनी १९७२ मध्ये घेतलेली भूमिका चुकीची होती, असं म्हणण्याचे धाडस आजचे सरसंघचालक राजेंद्र सिंहजी दाखवणार आहेत का? भाजपचे कायमच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे राहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची चूक मतदारांकडून कदापीही होता कामा नये. आज भाजपकडून रिपब्लिकन पार्टीच्या उमदेवारांना पैसा निवडणुकीसाठी पुरवला जात आहे. या मागचे षडयंत्रं तुम्ही समजून घ्या.

रिपब्लिकन पक्षाची व मुस्लिमांची मते परंपरेने काँग्रेसला मिळत आली आहेत. या मतांची विभागणी व्हावी. मुस्लिमांनी रिपब्लिकन पक्षाला मते दिली तर काँग्रेसची मते कमी होतील हा भाजपचा डाव आहे. दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची व्होटबँक आहे. तीच फोडायची असा डाव भाजपने टाकला आहे. यासाठी कोट्यवधीचा निधी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना भाजपकडून पुरवला जात आहे. त्यांचा हा कावा ओळखून त्याला मूठमाती देण्याचं काम मतदारांनी केलं पाहिजे. देशाला सुस्थिर सरकार फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो. इतकेच नव्हे तर देशाची एकात्मता टिकवण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो. त्यामुळे काँग्रेस सत्तेवर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दरेकरांची राऊतांवर टीका

‘भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे’, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. राऊतांच्या या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊतांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल. अर्थात त्यांना लक्षात आलेला हा मुद्दा फायद्याचा आहे की तोट्याचा, हे येणाऱ्या काळात समजून येईल, असा टोला दरेकर यांनी राऊतांना लगावलाय.

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आरोपांनाही उत्तर दिलंय. ईडी आणि आयकर विभाग नेत्यांसोबत त्यांच्या नातलगांनाही जाणून-बुजून त्रास देत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता, अशा प्रकारच्या आरोपांना काही महत्व द्यायचं कारण नाही. त्यात तथ्य नसतं. त्याचं कारण सीबीआय असेल किंवा अशा यंत्रणा लोकशाहीत कुणालाही विनाकारण त्रास देत नाहीत. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा हक्क अबाधित ठेवण्याचं काम राज्यघटनेनं केलं आहे, असं उत्तर दरेकरांनी दिलंय.

त्याचबरोबर नारायण राणे यांचा लोकसभेतील व्हिडीओ शिवसेनेकडून व्हायरल केला जात आहे. त्यावर बोलताना शिवसेनेला अभिमान वाटायला हवा की राणेंसारखा महाराष्ट्रातील क्लेरिकल माणूस बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं राज्याचा मुख्यमंत्री झाला. आज भाजपकडून देशाचे उद्योगमंत्री झाले. त्याबाबत आपल्या मनात असूया असण्यापेक्षा आनंद झाला पाहिजे. आज कुठल्याही प्रकारचं कॉन्व्हेंट शिक्षण नसताना, कुठलाही राष्ट्रीय स्तरावरचा अनुभव नसताना, जेव्हा आपल्या मातीतला नेता एवढं कर्तृत्व गाजवतो. त्याचा अभिमान वाटला पाहिजे. मात्र, त्यासाठी मन मोठं लागतं. पण, शिवसेनेकडून राणेंबाबत चांगलं बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button