Top Newsराजकारण

काँग्रेसची अवस्था ओसाड गावच्या पाटलासारखी; शरद पवारांकडून परखड शब्दात समाचार

मुंबई : काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय. असं असलं तरी काँग्रेस आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच असं पवारांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का, असं पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा शरद पवार म्हणाले, ‘तिथं काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग विरोधी पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल असंही शरद पवार यांनी सांगितले आहे.

प्रशांत किशोरची मला गरज नाही

मागील काही काळात दिल्लीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नावाची प्रचंड चर्चा आहे. याच प्रशांत किशोर यांनी पवारांची दोनदा भेट घेतल्यानंतर पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी ते दिल्लीत मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चाही सुरू झाली. या चर्चेवर पवारांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. मला प्रशांत किशोरची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशा शब्दांत पवारांनी आपली भविष्यातली राजकीय मोर्चेबांधणी कशी असेल, याबद्दल सुतोवाच केलं.

ज्यांना जमिनी राखायला दिल्या, त्यांनीच दरोडा टाकला : पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसची अवस्था जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावर नाना पटोलेंनी, काँग्रेसनं अनेकांना जमिनी राखायला दिल्या, त्यांनीच जमिनी चोरल्या, डाका टाकला, अशा शब्दात नाना पटोलेंनी पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

मीडियाशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोलेंनी लगावला. तसेच, काँग्रेसनं जमीनदारी केली नाही, उलट ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तो आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पवारांनी केलेलं काँग्रेसचं वर्णन अतिशय योग्य : फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेबाबत आपली भूमिका व्यक्त केली. या राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वादात आता देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. ‘शरद पवारांनी केलेलं काँग्रेसचं वर्णन अतिशय योग्य आहे’, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच, शरद पवार यांनी काँग्रेसवर व्यक्तं केलेलं मत योग्य असल्याचं म्हटलं. मला वाटतं की, शरद पवारांनी केलेलं काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. सध्या काँग्रेस आपल्या जुन्या पुण्याईवर जगतोय. मालगुजारी तर गेली, आता उरलेल्या मालावर गुजरान चालली आहे. शरद पवारांनी केलेलं वर्णन चपखल लागू होणारं आहे, अशी टीका फडणवीसांनी काँग्रेसवर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button