मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. यापूर्वी ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील भाजपवर निशाणा साधला होता. दरम्यान, राज्यातील एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची उद्या संध्याकाळी एक तातडीची बैठक बोलावली आहे.
निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटीसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील. पण सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे वाझे व इतरांच्या जवाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
नवाब मलिकांकडूनही आरोप
ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे, काही ठिकाणी छापे टाकले जात आहेत. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्यापद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत व कारवाई होतेय. याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू झाली आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या तातडीची बैठक
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेते, मंत्री यांच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची उद्या एक तातडीची बैठक बोलावली आहे.
एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस, भाजपची नुकतीच झालेली जनआशीर्वाद यात्रा तसेच भाजपकडून केला जाणारा हल्लाबोल या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे. शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणे अपेक्षित आहे. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व १६ मंत्र्यांचा समावेश असेल, असे सांगितले जात आहे. शरद पवार हे नियमित अंतराने पक्षाच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेत असतात. प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. ज्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याची गरज असते, त्यांना सूचना, सल्ले दिले जातात. तसेच राज्याच्या राजकारणातील काही विषयांवर चर्चा अपेक्षित आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.