नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान; शंभूराज देसाई यांचे टीकास्त्र
सातारा: नारायण राणे बत्ताशावरचे पैलवान, ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत, असा शब्दांत गृह राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी जोरदार टीकास्त्र डांगले आहे.
अलीकडेच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीमुळे या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. जिल्हा बँकेची निवडणूक जिंकल्यानंतर राणे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. याला शिवसेना नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादित मतांच्या निवडणुका आहेत. जनमताचा कौल घ्यायला पुढे या म्हणजे तुम्हाला कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकप जिंकण्याची भाषा
नारायण राणे आणि भाजपने काही जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेली नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २५ मते ५० मते असतात. आता अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत. हे म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असे बोलण्यासारखे आहे. नारायण राणे हे अजित पवार कोण असे विचारताहेत. त्यांनी अजित पवारांना ओळखण्याची गजर नाही. संपूर्ण राज्य, देशाला अजित पवार कोण हे माहिती आहे. आता जिल्हा बँक जिंकल्यानंतर हे आम्ही महाराष्ट् जिंकू, सत्ता परिवर्तन करू असे दावे करताहेत. ठीक आहे भाजपवाले स्वप्न बघताहेत. आता त्यात आणखी एक व्यक्तीची भर पडली आहे. त्यांना शुभेच्छा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी लगावला.