प्रत्येक शिवसैनिकात राणेंचे तोंड बंद करण्याची ताकद; शंभूराज देसाईंचा इशारा
सातारा : नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षानं सांगितलं म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री. राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई त्यांनी नारायण राणेंना इशाराच दिलाय.
राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. २५ जून रोजी चिपळूणमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर झापताना सीएम बीएम गेला उडत, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे.
चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणेंचा तोल गेल्याचंही दिसलं. राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.” समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं होतं.