राज्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे मुख्यमंत्री; नारायण राणेंची घणाघाती टीका

मुंबई : यशवंतराव चव्हाण आणि एकापेक्षा एक मुख्यमंत्री या राज्याला लाभले. पण उद्धव ठाकरे हे राज्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे मुख्यमंत्री ठरले असल्याची घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे आणि विषय काढतात राम मंदिराचा. हा काय बालिशपणा आहे! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. कुणाचे मुडदे कुठेही पडू शकतात अशी स्थिती असल्याचा घणाघात राणेंनी केलाय. राज्यभरात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. कोण देसाई आहे? त्याला प्रोटेक्शन दिलं आहे. हे शिवसैनिकांचं राज्य नाही तर मातोश्रीचं राज्य असल्याची टीकाही राणे यांनी केली आहे.
राज्यात सध्या गाजत असलेल्या मनसुख हिरेन प्रकरणावरुन भाजपकडून सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. याची लिंक थेट रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याशी असल्यानं हे प्रकरण हायव्होल्टेज बनलं आहे. अशावेळी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. सगळ्या पदांच्या बदल्यांचे टेंडर निघत आहेत. त्यामुळे टेंडर देऊन पोस्टिंग घेतलेले लोक काय प्रमाणिकपणे काम करणार? असा सवाल करत राणेंनी कुंपणच शेत खात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे सरकारवर केला आहे.
मुकेश अंबानींच्या घराच्या बाजुला जीप मिळते काय? तिथे पहिल्यांना सचिन वाझेच कसे पोहोचले? मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांचे संबंध काय? त्यांची ओळख कशी? अशी प्रश्नांची सरब्बतीच राणे यांनी केली आहे. मनसुख हिरेन यांना या प्रकरणातील सगळं काही माहिती होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप राणेंनी केलाय. संजय राठोड प्रकरण, दिशा सालियान प्रकरण किंवा सुशांत सिंह प्रकरण, या सगळ्यात आत्महत्या दाखवल्या जाऊन हत्या केल्या जात आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. एखादा मुख्यमंत्री आपल्याला सत्ता चालवायला जमत नाही म्हणून बाहेर पडला असता, असा टोलाही राणेंनी लगावला.
मुख्यमंत्र्यांना आव्हान
भाजपचे खासदार नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी राणे यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी कधी कॉलेज मागायला गेलो नाही. मी स्वतःच्या हिंमतीवर कॉलेज मिळवलं. परवानग्या घेतल्या. मी माझ्यासाठी कॉलेज किंवा हॉस्पिटल उभारलं नाही, तर सिंधुदुर्गवासियांसाठी उभारलं. त्यांचे ऋण फेडण्यासाठी. त्यांनी मला सहा वेळा निवडून दिलं. त्यामुळे कृतज्ञ भावनेतून रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारलं. स्वत:च्या पैशानं प्रकल्प उभे केले. मी उभारलेले प्रकल्प उद्धव ठाकरेंनी तिथे जाऊन पाहावेत. माझ्या कामाबद्दल त्यांनी बोलू नये, असा खोचक टोलाही राणेंनी लगावला. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे.