ज्याला कावीळ झालीय त्याला जग पिवळंच दिसतं; शंभूराज देसाईंचा पडळकरांवर घणाघात
सातारा : ज्याला कावीळ झालीय त्याला सर्व जग पिवळंच दिसतं” या म्हणीप्रमाणे गोपीचंद पडळकरांना या सरकारने कितीही चांगले निर्णय घेतले तरी त्यात खोटच दिसते, असं टीकास्त्र गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सोडलंय. साताऱ्यात शंभुराज देसाईंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. राज्य सरकार साडेपाच हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील जनतेसाठी देतेय. तुम्ही केंद्रातून किती मदत देताय, असा सवालही गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांना विचारलाय. गोपीचंद पडळकरांना चांगलं काम दिसत नाही, त्यांना यामध्ये खोटं काढायचीय, पण हे सरकार सर्व बाजूने तयार आहे, असंही शंभुराज देसाई म्हणालेत.
राज्यातील आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलं आहेः गोपीचंद पडळकर
तत्पूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांचा प्रचार करण्यासाठी प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर पंढरपुरात आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी आवताडे यांचा प्रचार करताना ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाच परंतु, राष्ट्रवादीवरही घणाघाती टीका केली. पडळकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलं आहे. त्याच्याविरोधात आमची भूमिका आहे, असं पडळकारांनी सांगितलं. त्यानंतर पडळकर ठाकरे सरकारवर जोरदार तुटून पडले होते.
कोरोनाच्या काळात सामान्य जनतेचं कंबरडे मोडले. एक वर्षे झाले तरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने काहीही केलं नाही. काल लॉकडाऊन जाहीर केला. हा लॉकडाऊन जाहीर करताना थातूरमातूर योजना जाहीर केल्या. त्याही जुन्याच योजना आहेत. नवीन काहीच नाही. या सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असं सांगतानाच या मतदारसंघात सर्व मंत्री येत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.