मनसुख हिरेन प्रकरणात पोलीस दलातील बडा अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर !
मुंबई : आता मनसुख हिरेन प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात ‘एनआयए’च्या रडारवर ठाण्यातील एक मोठा पोलीस अधिकारी असल्याची माहिती मिळतेय. एका माजी पोलीस अधिकाऱ्यानेच मनसुख हिरेनची हत्या केल्याचा संशय ‘एनआयए’ला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेनची हत्या झाली त्या दिवशी सचिन वाझेने मनसुख हिरेनला त्या पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन केल्याचं सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. एनआयएने या हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे जोडल्याची माहिती मिळतेय. इतकंच नाही तर एनआयए येत्या दोन दिवसांत याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणात बरेच मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हजारो कोटींच्या खंडणीच्या खेळात मनसुख हिरेनचा बळी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मनसुख हिरेन प्रकरणात विरारमधील एक बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आपल्या चोरी झालेल्या मर्सिडीज गाडीचा वापर झाल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय. २०१७ मध्ये परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना एन्टी एक्सटॉर्शन सेलमार्फत मला पोलीस ठाण्यात बोलावून घेत बळजबरीने डांबून ठेवलं. माझ्या दोन गाड्या मर्सिडीज आणि दुसरी गाडीही घेऊन गेले, असा आरोप राऊत यांनी केलाय.
ठाणे पोलिसांच्या या कृत्याविरोधात आपण न्यायालयात गेलो. न्यायालयाने मला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मी सर्वत्र गेलो पण कुणीही दाद दिली नाही, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केलीय. कोथमिरे यांना निलंबित करावं अशी मागणी करतानाच पोलिसांनी अनेकांची संपत्ती लुटल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माझ्या गाडीचा वापर झाला असावा. ‘एनआयए’ आणि राज्यांच्या पोलिसांना माझी विनंती आहे की, त्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.