शिक्षण

उद्यापासून राज्यातील शाळा ‘ऑनलाईन’ सुरू होणार

मुंबई: कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शाळा उद्या (१५ जून) पासून ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार आहेत. राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे ,अशी माहिती शालेय शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.

दत्तात्रय जगताप यांनी सांगितलं, १५ जूनपासून ऑनलाईऩ आणि इतर शक्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात पत्रक जारी करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये याचीही खबरदारी घेण्यास सांगण्यात येईल, असं जगताप यांनी सांगितलं.

राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने टप्प्यांनुसार लॉकडॉऊनचे निर्बंध लागू केले आहेत. तेव्हा शाळा सुरू करत असताना सरसकट सगळीकडे एकाचवेळी शाळा सुरू करता येणार नाहीत. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असंही जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button