शिक्षण

राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

मुंबई: गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्यात ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम पाळून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व निर्णय राहतील, असंही शासनाने स्पष्ट केलं आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी ही आनंदाची बाब आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच आता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

एक महिन्यापूर्वीच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. आणि मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील, असं चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी मत व्यक्त केलं होतं. चाइल्ड टास्क फोर्सकडून ज्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत, त्याबाबतची तयारी करून राज्यभर एकत्रित शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करणे योग्य ठरेल, असंही बकुळ पारेख यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button