शिक्षण

नाशिकमधील शाळा सोमवारपासून सुरु होणार

नाशिक : ओमायक्रॉनचा संसर्ग वाढताच राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवार (दि. २४) पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील शाळा व आश्रमशाळाही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या महापालिका, जिल्हा परिषद, खासगी शिक्षण संस्थांच्या सुमारे ५ हजार शाळा आहेत. त्यात साधारणत: १० लाख विद्यार्थी शिकतात. या सर्व शाळा १० जानेवारीपासून बंद आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता शासन निर्णयानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुलांची सुरक्षितता हीच प्राथमिकता

राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग आटोक्यात असल्यामुळे अखेर मागील २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवार २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. ज्या भागात कोरोना रुग्ण संख्या कमी आहे तेथे शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

पालकांच्या संमतीनुसारच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल. पहिली ते बारावी तसेच पूर्व प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाला निर्णय घ्यायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापालिका स्तरावर आयुक्त तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय घेणार होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, परिस्थिती नियंत्रणात असलेल्या ठिकाणी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकारपणे पालन करूनच शाळा सुरू करण्यात येतील. एकाने निर्णय घेतला म्हणजे दुसर्‍याने घेतलाच पाहिजे असे नाही. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिकता राहिलेली आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का, हे आम्ही पाहत आहोत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button