राजकारण

दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादांचे नाव गोवण्याचे कारस्थान; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागानं मोठी कारवाई केलीय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्रसरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्यसरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या प्रयत्नाला राज्यसरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले. भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल करण्यात आहे. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे, यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असंही मलिक म्हणाले.

जो खेळ बंगालमध्ये सुरु होता, तोच खेळ आता महाराष्ट्रात खेळला जातोय. निवडणुकीच्या आधीही हा बदनामीचा खेळ सुरु होता. भाजपने नेत्यांवर दबाव टाकून पक्ष सोडण्यावर भाग पाडले. अनेक लोक भाजपमध्ये तेव्हा गेले, ते आता सांगतात की, आम्हाला आता शांत झोप लागते. यावरुनच संस्थांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. मात्र, राज्य सरकार किंवा यातील एकही नेता अशा कारवाईंना घाबरणार नाही. अन्याय होतो आहे त्यावर लढा देऊ, अशा शब्दात मलिकांनी अजित पवारांवरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा इन्कार केलाय.

वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल

समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही, असे प्रश्न उपस्थित करत आज पुन्हा नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले.

काल जयदीप राणा या ड्रग पेडलरबद्दल मी काही तथ्य माध्यमांसमोर ठेवले. मात्र तेव्हापासून एक अपप्रचार सुरु आहे की, मी फडणवीस यांच्या पत्नीला या प्रकरणात खेचत आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी भाजपनेच महिलांचा अवमान केल्याचा आरोप केला. कालच किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या आई आणि बहिणीचा उल्लेख केला. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांची पत्नी, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात चौकशीला बोलावले होते. सोमय्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नीचे नाव घेऊन वारंवार आरोप करत असतात. या सर्व महिला नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत नवाब मलिक यांनी महिलांचा अवमान करण्याचा स्तर भाजपने खाली आणला आहे, आम्ही नाही असा थेट हल्ला केला.

कालच्या माझ्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले. त्यात ते माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडला. मला त्यांना सांगायचे आहे की, देवेंद्रजी तुम्ही तुमचे खास मित्र समीर वानखेडेकडून पंचनामा मागवून घ्यावा. त्यात कुठेही गांजा किंवा आपत्तीजनक वस्तू प्राप्त झाली याचा उल्लेख नाही. ज्यादिवशी जावयाच्या घरी छापा टाकण्यात आला त्यावेळी मीडियाला खोट्या बातम्या देऊन आम्हाला बदनाम केले गेले. माध्यमांना आज मी तो पंचनामा देत आहे. आता देवेंद्रजींनी माफी मागणार का?

मी जावयाची चार्जशीट कमकुवत करण्यासाठी एनसीबीवर आरोप करतोय, असेही सांगितले गेले. फडणवीस हे स्वतः वकील आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार सहा महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करावी लागते. समीर खान आणि सजनानीच्या केसमध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे. त्यामुळे मी चार्जशीट कमकुवत करत नाही, याही प्रकरणात आपण माफी मागणार का? असा थेट सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

मी राजीनामा दिला होता, यावरही फडणवीस यांनी बोट ठेवले. त्यावर स्पष्टीकरण देताना नवाब मलिक यांनी मी राजीनामा दिल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सावंत कमिशन बसवले गेले. विधानसभेत त्यावर चर्चा झाली. त्यावेळीही मी अशी भूमिका घेतली होती की, जर जनतेसाठी राजीनामा द्यावा लागला तर मी शंभरवेळा राजीनामा देईन माझ्यावर भ्रष्टाचाराचे नाही, तर कोर्टाचे आदेश न मानण्याचे आरोप ठेवले होते. कोर्टाच्या अवमानावर लोकायुक्ताने दखल घेण्याचे अधिकार नसतात. तरीही आम्ही लोकायुक्ताच्या चौकशीला समोर गेलो. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी केलेला हा दावा देखील फोल गेला, अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली.

काल फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे जाहीर केले त्यांना दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही. माझे अंडरर्वल्डशी संबंध आहेत, असे सांगितले गेले. पण माझे कधीच अंडरर्वल्डशी संबंध आलेले नाहीत. ज्यांचे घर काचेचे आहेत, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत असे फडणवीस म्हणाले होते त्यांना सांगू इच्छितो माझ्याकडे ना काचेचा महाल आहे ना काचेचे घर… त्यामुळे फडणवीसांना माझा थेट सवाल आहे. तुम्ही गृहमंत्री असताना सरकारवर सर्वाधिक टीका मी केली होती. ज्यादिवशी तुमच्या सरकारला एक वर्ष झाला, तेव्हा तोतया फडणवीस मंत्रालयात फिरत असल्याची टीका मी केली होती. तेव्हा मी तुम्हाला तोतया फडणवीसबद्दल माहितीही दिली होती. तो कुणासोबत उठतो, बसतो त्याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. जर राजकीय डूक धरायचा असता तर मी ही माहिती आपल्याला दिली नसती. त्यावेळी जर मी एका हॉटेलमध्ये झालेल्या भेटीचे फुटेज रिलीज केले असते, तर भाजपचे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नसते. राज्याचा प्रमुख म्हणून आपली जबाबदारी होती की, जर कुणी अंडरवर्ल्डशी संबंध ठेवत असेल तर त्यावर कारवाई केली पाहीजे. पण आपण कारवाई केली नव्हती असे का? गृहमंत्री असल्यामुळे आपल्याला मागच्या सरकारच्या काळात सर्व ब्रिफिंग होत होती. तर एका प्रश्नाचे उत्तर द्या, फोर सिझन हॉटेलमध्ये महागड्या पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. एका टेबलचे बुकिंग १५ लाखांपर्यंत असायचे. या महागड्या पार्ट्यांचा आयोजक कोण होता? याची माहिती तुम्हाला नव्हती का? आपले सरकार गेल्यानंतर या पार्ट्या कशा काय बंद झाल्या? तुम्ही या पार्ट्या का रोखल्या नाहीत, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावे लागतील, असे प्रतिप्रश्नही नवाब मलिक यांनी केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button