नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका करताना हिंदू-मुस्लीमात फुट पाडत असल्याचा आरोप केला आहे. ‘नेहरू, वाजपेयी सारख्या नेत्यांची जम्मू-काश्मीरसाठी दूरदृष्टी होती. पण, हे आताचं सरकार फक्त हिंदू-मुस्लीमात फूट पाडण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, या भाजप सरकारसाठी आता सरदार खलिस्तानी झाले, आम्ही पाकिस्तानी झालोत आणि फक्त भाजप हिंदुस्थानी आहे. हे सरकार फक्त नावं बदलण्याचं काम करत आहे. पण, नावं बदलल्याने काही होणार नाही. शहरांची नावे बदलली, अनेक शाळांना हुतात्म्यांची नावे दिली जात आहे. पण, शाळांची नावं बदलल्याने मुलांना रोजगार मिळणार नाही. केंद्र सरकार तालिबान आणि अफगाणिस्तानबद्दल बोलतात पण आपल्या देशातील शेतकरी आणि बेरोजगारीबद्दल कधीच बोलत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.
मेहबूबा मुफ्ती यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पीडीपी आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, भाजपच्या पाठिंब्यावर मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण, २०१८ मध्ये सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर भाजपने आपला पाठिंबा काढून घेतला.