Top Newsस्पोर्ट्स

लोकेश राहुलची ऐतिहासिक खेळी, रोहित शर्माला शतकाची हुलकावणी

लंडन : भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. राहुलला जवळपास दोन वर्षे कसोटी संघाबाहेर बसावे लागले होते. परंतु, इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वपूर्व अर्धशतकी खेळी केली होती. त्याने चांगला फॉर्म कायम राखताना आजपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावले. लॉर्ड्सवर होत असलेल्या सामन्यात राहुलने २१२ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक केले. लोकेश २४८ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२७ धावांवर नाबाद राहिला, अजिंक्य राहणे १ धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी ३ बाद २७६ धावा केल्या आहेत.

या सामन्यात राहुल आणि रोहित शर्मा या भारतीय सलामीवीरांनी अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी १२६ धावांची सलामी दिली. रोहितने उत्कृष्ट फलंदाजी करत १४५ चेंडूत ८३ धावांची खेळी केल्यावर त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. अँडरसननेच मग पुजारालाही अवघ्या ९ धावांवर माघारी पाठवले. यानंतर मात्र राहुलला कर्णधार कोहलीची चांगली साथ लाभली. या दोघांना शतकी भागीदारी रचण्यात यश आले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८४ धावांची खेळी करणाऱ्या राहुलने दुसऱ्या कसोटीत २१२ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं जेव्हा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हाच विराटच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. त्यालाही प्रथम फलंदाजीच करायची होती. त्याचा हा आत्मविश्वात रोहित व लोकेश यांनी सार्थ ठरवला. या दोघांनी संयमानं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर लोकेश व कर्णधार विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. विराटनं काही सुरेख फटके मारून फॉर्म परतल्याचे संकेत दिले. त्याचे कव्हर ड्राईव्ह फटक्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. लोकेशनं कसोटीतील ६ वे शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवर शतक झळकावणारा तो तिसरा ( विनू मंकड, १९५२ व रवी शास्त्री, १९९०) भारतीय सलामावीर ठरला, तर एकूण दहावा फलंदाज ठरला. आशिया खंडाबाहेर मागील चार शतक करणारा भारतीय सलामीवीर म्हणजे लोकेशच.. त्यानं २०१५ मध्ये सिडनीत, २०१६ मध्ये किंग्स्टन, २०१८मध्ये दी ओव्हल आणि २०२१मध्ये लॉर्ड्सवर शतकी खेळी केली.

पहिल्या दिवसाचा शेवट जसा अपेक्षित होता, तसा झाला नाही. विराटचा फॉर्म परतलाय असे डोळ्यासमोर दिसत असताना दिवसातील अखेरच्या सहाव्या षटकात ऑली रॉबिन्सन यानं त्याला बाद केलं. लोकेश – विराट जोडीनं २०८ चेंडूंत ११७ धावा जोडल्या. विराट १०३ चेंडूंत ३ चौकारांसह ४२ धावांवर माघारी परतला. पुन्हा एकदा विराटच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल. लोकेश व अजिंक्य रहाणे यांनी टीम इंडियाचा आणखी एक धक्का बसू दिला नाही.

२०१९ नंतर कसोटी संघातून वगळल्यानंतर लोकेश राहुल भरपूर अभ्यास करून पुन्हा मैदानावर उतरला. मयांक अग्रवाल जायबंदी झाल्यामुळे लोकेशला पहिल्या कसोटीत रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची संधी मिळाली अन् त्यातही त्यानं दोन्ही डावांत ८४ व २६ धावांची खेळी केली. आता ऐतिहासिक लॉर्ड्सवर त्यानं पहिल्या कसोटीत हुकलेल्या शतकाची कसर भरून काढताना Honor Board वर नाव कोरले. रोहितचेही शतक पूर्ण झाले असते तर आजचा दिवस हा भारतीयांसाठी सोन्याहून पिवळा ठरला असता. पण, या सलामीवीरांनी रचलेल्या मजबूत पायावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी धावांचा डोंगर उभा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button