मुंबई / कोल्हापूर: शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. संजय राऊत यांनी काल टीका करताना मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांना घेऊन डुबतील अशी टीका केली होती. त्यावर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवाण प्रत्युत्तर दिले. शरद पवारांच्या पे रोलवर राहून संजय राऊत शिवसेना संपवत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांना घेऊन नाही तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना घेऊन डुबतील अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
संजय राऊत हे शिवसेना संपवत आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात कधी येणार असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. कारण शरद पवारांच्या पेरोलवर राहून संजय राऊत हे शिवसेना संपवत आहेत. सत्ता स्थापनेच्या वेळी कुणी कुणाला भरीस पाडले हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. या सत्तेचा उपभोग केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. छोटे घटक पक्ष सोडा पण काँग्रेस आणि शिवसेनेमधील मोठा गट देखील नाराज असल्याचे या वेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत तुम्ही कुणाला धमकी देत आहात. आता त्या काळातला भाजप राहिला नाही. ॲक्शनला रिॲक्शन येणार हे लक्षात घ्या. दोषी असतील ते जेलमध्ये जातील, भले ते भाजपचे असले तरी, ज्यांनी चुकी केली ते शिक्षा भोगतील. मात्र गल्लीतल्या दोन मंडळासारखी कसली भाषा करताय. तब्येत बरी असेल तर सांगण्याची आवश्यकता नसते, मात्र तब्येत बरी नसली की मला काही झाले नाही हे वारंवार सांगावे लागते. यंत्रणेवर दोष देता म्हणजे तुम्ही घटनेवर दोष देत आहात.
छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेच नाहीतर मराठा समाजासाठी जे जे आंदोलन करतील त्यांना आमचा पूर्णपणे पाठींबा असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. श्रीमंत शाहू महाराज, उदयनराजे, समरजितसिंह घाटगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरावे. त्या आंदोलनाला समाज म्हणून आम्ही सगळे जोडले जाऊ. या सरकारला मराठा आरक्षण द्यायचं नाही किंवा कोणत्याही पातळीवर काम करायचे नाही. त्यामुळे या सरकार विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे असंही ते म्हणाले.
संजय राऊतांना शिवसेना संपविण्याची राष्ट्रवादीकडून सुपारी : नारायण राणे
एवढं राजकारण तापलं असताना. नारायण राणे कसे गप्प बसतील. राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. त्यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. असा घणाघातही राणेंनी केला आहे.
राऊतांच्या आरोपावर बोलताना, पत्रकार आहेस, दे पुरावा, तुझी जमीन, ५० एकर ५० लाखात घेतली, बरं ते पैसे आणलेस कुठून, बरं हा सुजीत पाटकर कोण, त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा डायरेक्टर असू शकतात, स्वत आधी उत्तरं दे, असे म्हणत राणेंनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शिवसेना वाढवण्यासाठी नाहीय, याचं लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर बसलेत ना तिथे आहे, हा अर्धा नाही पूर्ण राष्ट्रवादीचा आहे, जेव्हा उद्धव ठाकरे पवारांसोबत गेले, तेव्हा संजय राऊतच होते. तुझी कुंडली माझ्याकडे आहे, सगळी बाहेर काढून टाकेल, केलेल्या केसेसबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल मला सगळं माहितीय, राऊतांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एवढं गप्प बसू नये, थोडी पुजा करावी, हे करायला पाहिजे हो, त्याशिवाय तोंड गप्प नाही होणार, असा इशाराही राणेंनी दिला आहे.
बाळासाहेबांबद्दल बोललेलं मी कधी ऐकून नाही घेतलं, एवढा घाणेरडं बोललेलं आहे, हा कसा झोळी घेऊन फिरायचा, मी पाहिलाय. का रे बाबा तुझा प्रवीण राऊतशी संबंध काय? असा सवाल राणेंनी केलाय. अजून बरंच यायचंय. पगारी नेता आहेस तू, फूकट नाही, ओव्हर टाईम करुन कमवतो, प्रवीणच्या चौकशीनंतर आता आपण पण अडचणीत आहोत हे कळल्यावर राऊत घाबरले. त्यामुळे त्यांचा थयथयाट झाला आहे. अशी घणाघाती टीका आज नारायण राणेंनी केली आहे. त्यामुळे राजकारणात चांगलीच फोडणी पडली आहे.
संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. हाच धागा पकडत ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील, असा जोरदार टोला राणेंनी लगावला आहे.राणे म्हणाले की, विकासावर बोला, ते बोलत नाही हा माणूस. जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल वृत्तपत्रांनी बातमी दिली, राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, अरे यावर काहीतरी बोल, राज्याची दयनीय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचं आंदोलन सुरु आहे. पण काही नाही, इंडस्ट्री मिनीस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले. कंबोजने सांगितलं, चेक दिला संजय राऊतला. एका बाजूला पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना, आणि त्यांना माहितीय, आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कोण नाहीय, आधी बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली. आता एक आरोप झालाय. पण ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील. मी कुणाला घाबरत नाही, तू शिवसेनेत आला कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनी आला. आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, तू ५ पैसे तरी दिले का?, असा खोचक सवाल राणेंनी राऊतांना विचारलाय.
राऊतांवर लोकप्रभातील लिखाणावरुन घणाघात
‘लोकप्रभात असताना, उद्धव आणि साहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता? प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. शिवसेना वाढवण्यासाठी नाहीय, याचं लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर बसलेत ना तिथे आहे. हा अर्धा नाही, पूर्ण राष्ट्रवादीचा आहे’, असा जोरदार टोलाही राणेंनी लगावलाय.
राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही त्यांनी टोला लगावला. यावेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना राऊत यांच्याबद्दल काय वाटायचे याबाबतची कात्रणेही राणे यांनी वाचून दाखविली.