संजय राऊत शिवसेनेला काँग्रेसमध्ये विलीन करणार : पडळकर
मुंबई: भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सामानातील रोखठोक सदरात लिहिलेल्या लेखावरुन पडळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच, यात त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तुलना थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.
त्यावरुनच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रुपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय, असे पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत म्हणतात की, लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसले. प्रियंका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.