माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. मृदू स्वभावाचे राजकारणी अशी संजय देवतळे यांची ओळख होती. अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेले देवतळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती.
संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. मात्र, आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.
संजय देवताळे यांच्या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. ते ४ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा त्यांनी सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ ची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात नुकताच प्रवेश केला होता.
माजी मंत्री तथा त्यांचे काका दादासाहेब देवतळे यांच्या अकाली निधनानंतर माजी केंद्रीय अर्थ मंत्री व काँग्रेसचे तेव्हाचे खासदार शांताराम पोटदुखे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना वरोरा-भद्रावती विधानसभेची उमेदवारी मिळाली. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुडे यांचा पराभव करून विजयी झाले होते. सलग २० वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तिथून त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हा शिवसेनेत असलेले काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांनी २ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. आ. सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार नरेश पुगलिया, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री हंसराज अहिर, आमदार सुभाष धोटे यांनी देवतळे यांच्या निधनबाबद्दल शोक व्यक्त केला आहे.