फोकस

समीर वानखेडे पुन्हा एनसीबीच्या विभागीय संचालकपदी कायम

 

मुंबई : अंमली पदार्थ नियामक विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वानखेडे हे पुढील सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी कायम असणार आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरू झाल्यापासून समीर वानखेडे चर्चेत आहेत.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ या जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर २ ऑक्टोबरला घातलेल्या छाप्याचं त्यांनी नेतृत्व करत अनेकांना ताब्यात घेतलं. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह जवळपास २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. समीर वानखेडेंच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रवक्ते नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला आहे. तसंच, वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

समीर वानखेडे ही २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून काम पाहिलं आहे. समीर वानखेडे यांची सप्टेंबर २०२० मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीमध्ये बदली झाली होती. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात सुमारे १७ हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button