सरकारच्या लसीकरणाच्या नियमामुळे मुंबईतील मॉल्स पुन्हा बंद !
मुंबई : राज्यात १५ ऑगस्टपासून निर्बंधांमध्ये शिथिलथा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारनं घेतला. यात राज्यातील सर्व मॉल्स, दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण असं असलं तरी मुंबईतील बहुतांश मॉल्स आता पुन्हा एकदा धडाधड बंद होऊ लागले आहेत. यामागचं कारण आहे राज्य सरकारनं मॉल्स सुरू करण्यासाठी लावण्यात आलेल्या अटी हे आहे.
राज्यातील मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी यात मॉल्समधील सर्व कर्मचाऱ्यांचं कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करुन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे मॉल सुरू झाले असले तरी त्यातील दुकानांमधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे अनेक दुकानं अजूनही बंद आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मॉल्सच्या मालक आणि व्यवस्थापकांना मॉल्स पुन्हा सुरू करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. पण ते पाळण्यात आलेलं नाही, असं मॉल्सच्या मालकांचं म्हणणं आहे. कमीत कमी एक डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मॉल्समध्ये काम करू दिलं जाईल असं चहल यांनी आश्वासन दिल्याचं मॉल्सच्या मालकांचं म्हणणं आहे. पण राज्य सरकारच्या गाइडलाइननुसार कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्याच कर्मचाऱ्यांना मॉल्समध्ये काम करण्याची अट ठेवण्यात आली आहे. अद्याप बहुतांश मॉल्समधील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यामुळे मॉल्स बंद ठेवण्याची नामुष्की मॉल्सच्या मालकांवर ओढावली आहे.
राज्य सरकारनं मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली असतानाही मुंबईतील नामवंत मॉल्स अद्याप सुरू होऊ शकलेले नाहीत. मालाड येथील इनॉरबिट, कांदिवलीतील ग्रोवेल्स १०१ आणि घाटकोपरमधील आर सिटीसारखे मोठे मॉल्स देखील अद्याप बंदच आहेत. याशिवाय लोअर परळ येथील फिनिक्स मॉल देखील आज बंद होता. ठाण्यात विवियाना आणि कोरम मॉल मात्र आज सुरू आहेत.