आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू, आळंदीत उद्यापासून ७ दिवस संचारबंदी

पुणे : संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २८ जून ते ०४ जुलैपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलीय. देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीमध्ये देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार आहे. देहू, आळंदी परिसरातील अत्यावश्यक वाहने तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेमधील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल, सिनेमागृह नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट या काळात दुपारी ४ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के % क्षमतेने सुरु राहतील. दुपारी ४ नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील.
लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवा यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे (उद्याने) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहतील,
सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ५० टक्के कर्मचारी क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.
शासकीय कार्यालये अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त ५० टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी. सर्व आउटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील. सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवारदुपारी ४ वाजपर्यंत परवानगी राहील. उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा ३ तासांपेक्षा जास्त असू नये सदर ठिकाणी खाद्यपदार्थचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.
अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी अंत्यविधीशी संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील. महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ४ वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.
कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.




