मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुपारी १२.१५ च्या सुमारास दोघांची भेट झाली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजता ही भेट नियोजित आहे. त्यानंतर संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मी देवेंद्रजींना सांगितलं की, मराठा समाजातील गरिबांची वाईट परिस्थिती आहे. समाज अस्वस्थ आहे. या समाजाला न्याय मिळवून दिला नाही तर आपण सर्वजण जबाबदार असू. आपण या समाजाला न्याय देण्यासाठी राजकारणापलिकडे पाहायला हवं. त्यासाठी मुख्यमंत्री – विरोधी पक्ष नेते यांनी सर्वांनी एकत्र यायला हवं. मी हात जोडून सांगितलं, विनम्रपणे सांगितलं माझं तुझं करण्यापेक्षा आपण एकत्र येऊ. आता आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही तर जे काही समाजाचं होईल, त्यासाठी माझ्यासह तुम्ही-आम्ही सर्व आमदार खासदार सर्व जबाबदार असतील, असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
संभाजीराजेंनी काल शरद पवार आणि राज ठाकरे यांचीही भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट झाली. यावेळी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट असल्याचं संभाजीराजे म्हणाले.
राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जातपात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जीवलग मित्र होते. दोन्ही घराण्याचं मैत्रीचं नातं आजही काम आहे. राज आणि माझा कॉमन पाईंट आहे. किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती संभाजीराजे यांनी राज यांच्या भेटीनंतर दिली.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे.