संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणावर ४० मिनिटे चर्चा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खसादार संभाजीराजे छत्रपती राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत. शुक्रवारी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पुढे काय मार्ग काढायचा, तसेच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र कसे आणायचे याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील संभाजीराजेंनी भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच मराठा आरक्षण कायदेविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीही यांच्यात तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राजेंनी म्हटलंय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण कायदेविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी या बैठकीत उपस्थित होते. मराठा आरक्षणाविषयक कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. कायदेशीर बाबींच्या माध्यमातून आरक्षण आपल्याला मिळू शकते. अडचणी या निश्चित आहेत परंतु त्यातून मार्ग काय काढता येईल याबाबत चर्चा झाली असल्याचे राजेंनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणासाठी सगळ्याच पक्षातील प्रमुख एकत्र कसे येता येईल याविषयावर देखील चर्चा केली असल्याचे राजेंनी सांगितले आहे. तर दुसरा विषय राज्याभिषेक सोहळ्याचा होता. तसेच गडकिल्ल्यांबाबच्या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली आहे. एकंदरीत ज्या आशेने आलो आहे त्या प्रमाणे सर्व गोष्टी चालू आहेत. पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
फडणवीसांना संभाजीराजेंची विनंती
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजातील लोकांची वाईट परिस्थिती आहे. लोकं दुःखी,अस्वस्थ आहेत हे त्यांना सांगितले आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून नाही दिला तर त्यांना आपण सर्वजण जबाबदार असून त्यामुळे मराठा समाजाला न्याय द्यायच्या असेल तर राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करावा लागेल असेही फडणवीसांना सांगितले असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. तसेच माझ-तुझ न करता एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ अशी विनंती फडणवीसांसह सर्व नेत्यांना केली असल्याचे राजेंनी सांगितले आहे.